डिपीचा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:44 PM2020-05-19T12:44:37+5:302020-05-19T12:44:50+5:30
जळगाव : जळालेल्या डीपीच्या ठिकाणी महावितरणतर्फे नवीन डिपी बसविण्यात आली. मात्र, वर्षभरानंतरही महावितरणतर्फे ही डिपी सुुरु न करण्यात आल्याने, ...
जळगाव : जळालेल्या डीपीच्या ठिकाणी महावितरणतर्फे नवीन डिपी बसविण्यात आली. मात्र, वर्षभरानंतरही महावितरणतर्फे ही डिपी सुुरु न करण्यात आल्याने, कांचन नगर परिसरातील रहिवाशांनी सोमवारी दुपारी या डिपीचा चक्क वाढदिवस साजरा करुन महावितरणच्या निषेध नोंदविला.
कांचन नगरला लागून असलेल्या महावीर नगरातील विद्युत डिपीचा अचानक स्फोट होऊन ही डिपी पूर्णपणे जळाली होती. परिणामी या डिपीवरील नागरिकांची तात्पुरती विज जोडणी, तात्पुरता विद्युत खांब उभारुन त्यावर करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी महावितरणतर्फे जळालेल्या डिपी जवळ नवीन डिपी उभारण्यात आली. यावेळी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नव्या डिपीवरुन लवकरच जुन्या ग्राहकांची वीज जोडणी करुन डिपी सुरु करणार असल्याचे नागरिकांना आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटुनही ही डिपी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी परिसरातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत डिपीला हार घालून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी करत डिपीचा वाढदिवस साजरा केला.
अधिकरी व मक्तेदार दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांचा संताप
सोमवारी येथील नागरिकांनी या डिपीचा अनोखा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा निषेध नोंदविला. यावेळी रहिवाशांनी सांगितले की, डिपीचे काम झाल्यानंतर सुरुवातीपासूनच डिपी सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करित आहोत. सुरुवातीला अधिकाºयांनी लवकरचं डिपी सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटुनही डिपी सुरू करण्यात आली नव्हती. त्यानंतर पुन्हा अधिकाºयांना विचारणा केली असता, त्यांनी मक्तेदाराकडे बोट करुन, काम अपुर्ण असल्याचे सांगितले. तर मक्तेदाराने कामाचे बिल मिळाले नसल्याचे सांगितले. काही दिवस अधिकारी व मक्तेदार एकमेकांकडेच बोट दाखवित राहिले. या संदर्भात कार्यकरी अभियंता संजय तडवी यांच्याकडेदेखील तक्रार केली होती. त्यानींही लवकरचं डिपी सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, तरीदेखील डिपी सुरु झालीच नाही.
डिपीचे बसविण्याचे काम दिलेल्या मक्तेदाराला डिपी सुरु करण्यासंदर्भात अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, ते वेळोवेळी काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे सांगून, काम पुढे ढकलतात. या प्रकारा संदर्भात आपण वरिष्ठांकडे देखील तक्रार केली आहे.
-रोहित गोवे, सहायक अभियंता,
शनिपेठ विभाग, महावितरण