उकाड्यात महावितरणचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:32+5:302021-05-17T04:14:32+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पहावयास मिळत आहे. यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असून, घरात थांबणेही कठीण झाले ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पहावयास मिळत आहे. यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असून, घरात थांबणेही कठीण झाले आहे. त्यात महावितरणने ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू केल्यामुळे हा उकाडा नागरिकांना असहनीय झाला आहे. दररोज महावितरणकडून चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. दुरुस्तीच्या नावावर महावितरणने पुकारलेल्या अघोषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मालमत्ताकराची चार कोटींची वसुली
जळगाव- मनपा प्रशासनाने ३१ मेपर्यंत मालमत्ता कराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना एकूण रकमेवर दहा टक्के सूट निश्चित केली आहे. या सवलतीचा लाभ शहरातील नागरिक घेताना दिसून येत असून, आतापर्यंत महापालिका प्रशासनाने ४ कोटी रुपयांची वसुली केली असून, ३१ मेपर्यंत वसुलीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी एप्रिल व मे महिन्यात महापालिकेची मालमत्ता कराची शून्य टक्के वसुली झाली होती. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मनपाने वसुलीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
अखेर एसएमआयटी परिसरातील रस्त्याची दुरुस्ती
जळगाव -शहरातील अनेक भागांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मनपा प्रशासनाने पावसाळ्याआधी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून अनेक वर्षांपासून खराब झालेल्या एस एम आय टी महाविद्यालय परिसरातील रस्त्याची अखेर मनपाने दुरुस्ती केली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. पावसाळ्यानंतर या रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे अशीही मागणी या भागातील नागरिकांनी आता केली आहे.