महावितरणचे खेडी बुद्रूकला होणार दोन नवीन `उप केंद्र `
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:06+5:302021-06-24T04:13:06+5:30
जळगाव : महावितरणची विज पुरवठ्याची यंत्रणा सक्षम होण्यासाठी केंद्र शासनातर्फे शहरी भागात एकात्मिक उर्जा विकास योजना राबविण्यात येत आहे. ...
जळगाव : महावितरणची विज पुरवठ्याची यंत्रणा सक्षम होण्यासाठी केंद्र शासनातर्फे शहरी भागात एकात्मिक उर्जा विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गंत सध्या स्थितीला शहरातील विज यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी महावितरणतर्फे खेडी बुद्रूक येथे दोन नवीन उप केंद्र उभारण्यात येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव महावितरणच्या जळगाव कार्यालयाकडून एमआयडीसीतील मुख्य अभियत्यांकडे पाठविण्यात आला आहे.
जळगाव शहरात सध्यस्थितीला महावितरणचे पाच उपकेंद्रे (सब स्टेशन) आहेत. या केंद्रावरची सर्व यंत्रणाही अद्यावत आहे. मात्र, शहरातील दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी लक्षात घेता, सध्याचे उपकेंद्र हे पुरेसा विज पुरवठा करण्यासाठी अपूर्ण पडत आहे. त्यामुळे काही उपकेंद्रावर विजेचा भार कमी जास्त होऊन, विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून जळगाव शहर महावितरण प्रशासनातर्फे खेडी बुद्रूक या ठिकाणी दोन नवीन उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उपकेंद्र उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून, तसा प्रस्तावही मुख्य सर्कल कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या दोन प्रस्तावित उपकेंद्रांमध्ये पहिल्या उपकेंद्राच्या उभारणीसाठी ३ कोटी ११ लाखांचा खर्च येणार असून, दुसऱ्या उपकेंद्रासाठी ४ कोटी ७७ लाखांचा खर्च येणार आहे. गेल्या महिन्यातच हा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
इन्फो :
निमखेडी शिवारात पॉवर ट्रान्सफार्मर बसविणार
खेडी बुद्रूक येथे नवीन उपकेंद्रासह निमखेडी व रिंगरोडला दोन ठिकाणी पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. यात एका ट्रान्सफार्मसाठी ७८ लाख रूपये खर्च येणार असून, दुसऱ्या ट्रान्सफार्मसाठी ९२ लाख रूपये खर्च येणार आहे. दरम्यान, उपकेंद्राच्या अंदाजपत्रकातच हा खर्चही समाविष्ठ करण्यात आला आहे.
इन्फो :
विज पुरवठा `खंडित`चे प्रमाण कमी होणार
जोऱ्याने वारा आला किंवा पाऊस आला तर लगेच शहरातील विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे उद्योग-व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. मात्र, खेडी बुद्रूकला नवीन `उप केंद्र उभारल्यानंतर शहरातील विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होणार असून, ग्राहकांना पूर्ण क्षमतेने विज पुरवठा मिळणार असल्याचेही महावितरणतर्फे सांगण्यात आले.