म्यूकरचे दोन रुग्ण अपूर्ण उपचारांवरच माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:08+5:302021-06-04T04:13:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : म्यूकरमायकोसिसची लागण झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांना किमान १४ दिवस उपचार घ्यावे लागतात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्यूकरमायकोसिसची लागण झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांना किमान १४ दिवस उपचार घ्यावे लागतात तेव्हाच त्यांना घरी सोडता येते, असे निकष आहेत. मात्र, दोन रुग्णांनी जास्त वेळ रुग्णालयात थांबावे लागत असल्याचे सांगत स्वत: हून ते अपूर्ण उपचार घेऊन घरी परतल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दाखल रुग्णांची संख्या आता २९ वर आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर महत्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात सीटू कक्षात २० रुग्ण दाखल होते. मात्र, या ठिकाणचे दोन रुग्ण परतल्याने या ठिकाणी १८ तर अतिदक्षता विभागात ४ व ७ क्रमांकाच्या कक्षात ७ रुग्ण दाखल आहेत. दरम्यान एका महिलेवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही म्यूकरची चौथी शस्त्रक्रिया असेल. जिल्हाभरात म्यूकरचे ७३ रुग्ण झाले आहेत. दरम्यान, लागण झालेल्या रुग्णांना किमान चौदा दिवस इंजेक्शन व गोळ्या औषधी द्यावी लागते. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण बघून त्यांना घरी सोडावे की नाही, याबाबत निर्णय घेतला जातो, काही रुग्णांना दोन महिन्यांपर्यंत उपचार लागू शकतात, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी दिली.