मुडीच्या उसाचा गोडवा मध्यप्रदेश व गुजराथमध्ये पोहचला
By admin | Published: April 9, 2017 12:46 PM2017-04-09T12:46:31+5:302017-04-09T12:46:31+5:30
मुडी- बोदर्डे येथील ऊस रसवंतीसाठी प्रसिद्ध असून या उसाचा गोडवा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात मध्ये पोहचल्याने या ठिकाणी उसाला मोठी मागणी आहे.
Next
मुडी- बोदर्डे, ता.अमळनेर : येथील ऊस रसवंतीसाठी प्रसिद्ध असून या उसाचा गोडवा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात मध्ये पोहचल्याने या ठिकाणी उसाला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने ऊसाचे दर 30 ते 40 टक्यांनी वाढलेले आहेत.
सध्या तापमानाने 40 अंशाचा पारा पार केलाआहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असते. शरिराला गारवा मिळावा म्हणून अनेकजण शितपेय घेत असतात. त्यातच ऊसाचा रस हा पाचक असल्याने, त्याला सर्वाधिक मागणी असते. तसेच कावीळ आजारासाठीही ऊसाचा रस उपयुक्त असल्याची अनेकांची धारणा आहे.त्यामुळेच उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला अधिक मागणी असते.
मुडी, बोदर्डे, कळंबू, बाrाणे या परिसरात 86032 या गावराण वाणाची जवळपास 200 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. सध्या ऊसाला 6500 ते 7 हजार रूपये प्रतिटन भाव मिळत असून, यावर्षी तीस ते 40 टक्यांनी त्यात वाढ झालेली आहे. या परिसरातून दररोज किमान 100 टन ऊस बाहेरगावी निर्यात होत असून, ऊसामुळे जवळपास 200 जणांना रोजगार मिळालेला आहे.
मुडी-बोदर्डे परिसरात चार-पाच ऊसाचे व्यापारी असून, ते जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात,मध्यप्रदेशात मागणीनुसार पुरवठा करीत असतात. (वार्ताहर)