मुडी- वालखेडा पुलावरील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 06:56 PM2017-10-14T18:56:56+5:302017-10-14T18:59:45+5:30
पांझरा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे मुडी- वालखेडा दरम्यानच्या पुलाला अनेक खड्डे पडले असून त्यामुळे खासगीसह एस.टी.ची वाहतूकही बंद पडली आहे.
लोकमत ऑनलाईन अमळनेर/ मुडी, बोदर्डे, दि.14 : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे जळगाव व धुळे जिल्ह्याला जोडणा:या मुडी -वालखेडा पुलावरील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून या पुलावरची एस.टी. सह इतर खासगी वाहतूक बंद झाली आहे. 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावर काही वर्षापासून खड्डे पडले आहेत, मात्र जिल्ह्याच्या हद्दीच्या वादात आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस खड्डे वाढत गेले असून वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. दरम्यान, खाजगी वाहन चालकांनी पदरचे पैसे खर्च करून पुलावरील खड्डे बुजवून तोडगा काढला होता. आता पुन्हा या पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ऊस व्यापा:यांना बेटावदमार्गे 15 किलोमीटरचा जादा फेरा पडत आहे . पुलावरून अमळनेर- सोनगीर बस दिवसभरातून 12 फे:या करते. तसेच या मार्गावरून गुजरात आणि खान्देशातील व्यापारी अमळनेरशी जोडले गेले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक विद्यार्थी दररोज ये- जा करीत असतात. मात्र नादुरुस्त पुलामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ पाहत आहे . गेल्या वर्षी आमदार शिरीष चौधरी यांनी पाहणी करून मंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करून पुलाच्या नूतनीकरणाची मागणी केली होती, परंतु कोणतीही हालचाल झालेली नाही. दरम्यान, पुराचे वाहून जाणारे पाणी दोन मागार्ने अमळनेरात आणले जाऊ शकते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. अनेक वर्षांपासून जनतेच्या या मागणीकडे देखील सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.