महामार्ग चौपदरीकरणास लोकसभेनंतरच मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:34 AM2019-01-23T11:34:26+5:302019-01-23T11:35:23+5:30
निविदेत पुन्हा बदल
जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या समांतर रस्ते व चौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात चौपदरीकरणाच्या काढलेल्या निविदेत पुन्हा बदल झाला असून पथदिव्यांचे काम वगळण्यात आले आहे. त्यामुळे निविदेची किंमत ७० कोटींवरून ६२ कोटी झाली आहे. या बदलामुळे निविदा दाखल करण्यास आणखी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पर्यायाने हे काम लोकसभा निवडणुकीनंतरच प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आचारसंहितेपूर्वीच काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ‘नही’च्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या पहिल्या टप्प्यात खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंत सुमारे ८ किमी अंतराच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता डांबरीच केला जाणार आहे. तसेच प्रभात चौफुली, गुजराल पेट्रोलपंप व खोटेनगर येथे वाहनांसाठी भुयारी मार्ग तर खोटेनगर येथेच केवळ पादचाºयांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. तर अजिंठा चौफुली, आकाशवाणी व ईच्छादेवी चौफुली या ठिकाणी चौक विस्तार करून मध्ये सर्कल करून रोटरी पद्धतीने वाहतूक वळविली जाणार आहे. महामार्गाच्या मध्यभागी एलईडी लाईट तर प्रत्येक चौकात हायमास्ट लॅम्प बसविण्यात येणार आहेत. मात्र ‘नही’ने निविदा प्रसिद्धीनंतर पथदिव्यांचे काम वगळण्याची सूचना केली आहे.
१५ फेब्रुवारीनंतरच उघडणार निविदा
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाºयांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ६९ कोटी २६ लाखांची अंदाजित खर्चाच्या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. हे काम मक्तेदाराला दीड वर्षात पूर्ण करावे लागणार आहे. तर १० वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. २० डिसेंबरपासून ई-निविदा मागविण्यात आल्या असून अंतीम मुदत ३१ जानेवारी २०१९ होती. त्यामुळे या ई-निविदा १ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२ वाजता उघडण्यात येणार होत्या. मात्र आता १५ दिवस मुदतवाढ दिल्याने १५ फेब्रुवारीनंतरच या निविदा उघडण्यात येतील.
काम सुरू होणार कधी?... निविदेत बदल केल्याने निविदा दाखल करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. एकीकडे शासन आचारसंहितेच्या धाकाने विविध विकास कामांचे शॉर्ट टेंडर काढण्याची परवानगी देत असताना महामार्गाच्या निविदेची मुदत मात्र १५ दिवसांनी वाढविली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीनंतर निविदा अंतीम करण्याची व कार्यादेश देण्याची कार्यवाही होण्यास किमान १५-२० दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून जाईल. त्यामुळे हे काम थेट लोकसभा निवडणुकीनंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वीच काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली.
च्राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या कामासाठी करण्यात आलेल्या डीपीआरला स्थानिक प्राधिकरणांशी चर्चा करून वीज पोल, अतिक्रमण, गटारी स्थलांतराबाबत ना-हरकत घेऊन व कार्यवाही करण्याची अट घालण्यात आलेली असली तरीही समांतर रस्त्यांचे काम हे दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ शहरातून जाणाºया महामार्गाचे चौपदरीकरण व चौकांमध्ये भुयारी मार्गांचेच काम केले जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याची सुमारे ७० कोटीच्या कामाची निविदा २० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली.