बेवारस मृतांना " मू.जे " चे विद्यार्थी देताहेत अग्निडाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:17 AM2021-05-25T04:17:53+5:302021-05-25T04:17:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाकाळात एका विचित्र अशा परिस्थितीला सर्वांनाच सामोरं जावं लागलं. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला धावून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाकाळात एका विचित्र अशा परिस्थितीला सर्वांनाच सामोरं जावं लागलं. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला धावून येत नसल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाग्रस्तांची सर्वात वाईट अवस्था तर मृत्यूनंतर झाली. अनेकांच्या अंत्यसंस्कारालाही घरचे फिरकले नाहीत. अशावेळी मू.जे.महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मुकेश पाटील, विकास वाघ, अमोल बावणे, कृष्णा साळवे, मुकेश सावकारे, करण मालकर यांनी कोरोनानं मृत्यू झालेल्या तब्बल १०० पेक्षा अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. अजूनही त्यांचं हे काम सुरुच आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाने जिल्ह्यात अक्षरश: कहर माजवला होता. दररोज मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण मृत्यूमुखी पडत होते. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ओटे कमी पडायला लागले. अशातच कोरोनाची भीती, त्यामुळे नातेवाईक देखील अंत्यसंस्कारासाठी येत नव्हते. ही विदारक परिस्थिती पाहून मू.जे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला. मुकेश पाटील व विकास वाघ हे २१ मार्चपासून नेरीनाका स्मशानभूमीत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. त्यांच्या मदतीला कृष्णा सावळे, मुकेश सावकारे, करण मालकर व अमोल बावणे आदी विद्यार्थी असतात. गेल्या दीड महिन्यात शंभरपेक्षा अधिक मृतांवर या विद्यार्थ्यांनी अंत्यसंस्कार केले. शववाहिकेतून मृतदेह ओट्यावर नेणे. चिता रचून अंत्यसंस्कार करणे, स्मशानभूमीत साफसफाई करणे आदी कार्य हे विद्यार्थी करीत आहेत. मुकेश याने मू.जे.महाविद्यालयातून पॉलिटिकल सायन्स तर विकास याने मानसशास्त्र अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.
============
सावदा येथील मैत्रिणीच्या आईचा मृत्यू झाला. नंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यावेळी स्मशानभूमीतील विदारक परिस्थिती पहायला मिळाली. त्याठिकाणी मृतदेहांजवळ नातेवाईक नव्हते. अशा बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी आम्ही पुढाकार घेतला. २१ मार्चपासून हे कार्य करीत आहोत. ज्यांच्याकडे अंत्यविधीसाठी पैसे नाही, अशांना आपल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून मदत केली.
- मुकेश पाटील, विद्यार्थी
----------
मैत्रिणीच्या आईच्या अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभूमीत पाहिलेल्या परिस्थितीनंतर आम्ही मदतीसाठी पुढाकार घेतला. शववाहिकेतून मृतदेह ओट्यावर नेणे, चिता रचून अंत्यसंस्कार करणे, मनपा कर्मचाऱ्यांना मदत करणे सोबतच परिसरातील स्वच्छता करणे आदी कार्य केले जातात. आतापर्यंत शंभरावर बेवारस मृतांवर आम्ही विद्यार्थ्यांनी अंत्यसंस्कार केले आहे.
- विकास वाघ, विद्यार्थी
============
विद्यार्थ्यांचा सत्कार
सामाजिक भान बाळगून कार्य करणाऱ्या मू.जे.चे माजी विद्यार्थी मुकेश पाटील, अमोल बावणे, कृष्णा साळवे व विकास वाघ या चारही विद्यार्थ्यांचा सोमवारी प्राचार्य संजय भारंबे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी संदीप केदार उपस्थित होते.
===========
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव रूजाव्यात यासाठी स्वायत्त महाविद्यालयात अभ्यासक्रम त्या पद्धतीने तयार केले आहेत. विकास व मुकेश सारखे विद्यार्थी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ही खरच महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
- संजय भारंबे, प्राचार्य, मू.जे.महाविद्यालय