जळगावात शिवछत्रपतींना मानाचा मुजरा ! भव्य शोभायात्रा
By सुनील पाटील | Published: February 19, 2024 04:36 PM2024-02-19T16:36:26+5:302024-02-19T16:36:45+5:30
प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील व ॲड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर शोभायात्रा काढण्यात आली.
जळगाव : जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर माझा भगवा फडकला ! अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून शोभायात्रा काढण्यात आली. यात पारंपारिक, आदिवासी नृत्य, लेझीम, ढोल तसेच अश्वारूढ शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ माता, शिवराज्यभिषेक देखावा व शिवकालीन युद्ध कलेची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी लक्ष वेधून घेतले होते.
प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील व ॲड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, जयश्री महाजन, सीमा भोळे, शिवसेना प्रमुख नीलेश पाटील, प्रतिभा शिंदे, अश्विनी देशमुख, लीना पवार, नंदू आडवाणी, राम पवार, राजेश पाटील, पुरुषोत्तम चौधरी, कैलास सोनवणे, ललीत कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, मंगला पाटील, दिलीप सपकाळे, विनोद देशमुख आदी उपस्थित होते.
आदिवासी नृत्य, चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल येथून शोभायात्रा निघाली. कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक व गोलाणी मार्केटमार्गे शिवतीर्थ मैदानावर पोहचली. तेथे शिवप्रतिज्ञेने सांगता झाली.
दोन्ही मंत्र्यांनी धरला ठेका
मिरवणुक सुरु झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन यांनी ठेका धरत मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचा उत्साह वाढविला. त्यांच्यासोबत कुलभूषण पाटील, प्रतिभा शिंदे, कैलास सोनवणे सहभागी झाले होते. जयश्री महाजन, प्रतिभा शिंदे, मंगला पाटील यांनी लेझीम खेळून महिलांचा उत्साह वाढविला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड हे देखील पारंपारिक पोषाखात मिरवणुकीत सहभागी झाले होते.
पिंप्राळ्यात रात्री १२ वाजता शिवजन्मोत्सव
पिंप्राळ्यात ठिक १२ वाजता शिवरायांच्या पुतळ्याजवळ शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील यांच्याहस्ते आरती, पूजन व शिवगीत म्हणण्यात आले. यावेळी पुतळ्यावर पुष्पवृष्टी व आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी भव्य मिरवणुक काढण्यात आली. सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकांचा समारोप पिंप्राळा व शिवतीर्थ येथे झाला.