महुखेडय़ात ताप व अतिसाराची अनेकांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 10:32 PM2017-09-02T22:32:38+5:302017-09-02T22:39:24+5:30
महुखेडा गावाला मंजुर झालेली भारत निर्माण योजना ठेकेदाराने पूर्ण न केल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
लोकमत ऑनलाईन जामनेर : तालुक्यातील महुखेडा येथे सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आणि दूषित पाणी पुरवठय़ामुळे गावातील अनेक ग्रामस्थांना अतिसार आणि तापाची बाधा झाली असून डॉक्टरांनी आतार्पयत 15 रुग्णांवर उपचार केले. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तीन दिवसांपूर्वी गावाला दिलेल्या भेटी दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्याची सूचना देऊनही ग्रामपंचायतीतर्फे कोणतीही कार्यवाही न केली गेल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस असून स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक असते. तथापि या गावात तशी कोणतीही काळजी घेतली गेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे अनेक जण ताप व अतिसाराने त्रस्त आहेत. तीन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन हे गावात आले असता ग्रामस्थांनी त्यांच्यापुढे कैफियत मांडली असता त्यांनी ग्रामपंचायतीला स्वच्छता अभियान राबविण्याची सूचना केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महुखेडे हे गारखेडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असल्याने येथील डॉ. सूर्यवंशी यांनी गावात येऊन रुग्णांवर औषधोपचार केले व ग्रामपंचायतीने दूषित पाणी पुरवठा थांबविण्याबाबत पंचायतीला पत्र दिले. तथापि पदाधिका:यांनी याची कोणतीच दखल न घेतल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. पंचायत समिती अथवा आरोग्य विभागाने देखील दखल न घेतल्याने अखेर संतप्त नागरिकांनी शनिवारी ‘लोकमत’ कडे माहिती दिली. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली असता गावात व विशेषत: प्लॉट भागात मोठय़ा प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे निदर्शनास आले. तसेच सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी पाईप फुटल्याने रस्त्यावर वाहत असल्याचे तसेच बाधीत रुग्ण महिला व लहान मुले घराबाहेर खाटांवर गलितगात्र अवस्थेत पडून असल्याचेही दिसून आले. सरपंच पतीला घेराव महुखेडा हे गाव जामनेरपासून 9 कि.मी. अंतरावर असून लोकसंख्या सुमारे 550 आहे. ताप व अतिसाराचे सुमारे 15 रुग्ण सद्या गावात आहेत. ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संतप्त भावना असून शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी सरपंचाच्या पतीला घेराव घातला.