मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By admin | Published: June 8, 2017 02:06 PM2017-06-08T14:06:43+5:302017-06-08T16:28:01+5:30
जळगावातील भाविकांचा अपूर्व उत्साह
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 : जळगावातील मुक्ताबाई राम पालखीसह शेकडो वारकरी, भाविक गुरुवारी सकाळी पंढरपूरकडे विठू माऊलीच्या भेटीला मार्गस्थ झाले. जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा अर्थात जळगाव ते पंढरपूर वारीचे गुरुवारी वटसावित्री पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 8 रोजी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान होताना भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
राज्यातील जुनी आणि 145 वर्षाची परंपरा लाभलेली ही वारी डोळ्यात आणि मनात साठवून घेण्यासाठी आणि तिला निरोप देण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अप्पा महाराजांचे वंशज व विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या उपस्थितीत अॅड. सुशील अत्रे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, शिवाजीराव भोईटे यांच्याहस्ते पालखीचे पूजन होऊन ती मार्गस्थ झाली.
संत अप्पा महाराज समाधी मंदिर येथून ‘ज्ञानोबा तुकाराम’चा घोष करीत जिल्हा रुग्णालय रस्ता, संत कंवरराम चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, बाबा हरदासराम चौक, इच्छादेवी चौक, जुना शिरसोली नाकामार्गे शिवाजी उद्यान येथे ही पालखी पोहचली. तेथे मुक्ताबाई मंदिरात श्रीराम मंगेश जोशी महाराज यांच्याहस्ते पादुका पूजन झाले व दर्शन घेऊन पालखी व वारी पुढे जैन व्हॅलीमार्गे शिरसोली, वावडद्याकडे निघाली.
चार जिल्हे, 12 तालुके 1100 कि.मी.चा प्रवास
चार जिल्हे, 12 तालुक्यांमधून 130 गावांना भेट देत 1100 कि.मी.प्रवास ही वारी करणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 95 किलो मीटरचा प्रवास करुन वारी औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.