मुक्ताई गाथा सर्वांसाठी ठरणार मौलिक ग्रंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:56 PM2019-05-19T22:56:28+5:302019-05-19T22:57:25+5:30
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांचे २५७ अभंग संकलित करून त्याचा अर्थ आणि त्यासोबतच मुक्ताईंचे चरित्र अशा पद्धतीचा ग्रंथ प्रथमच प्रसिद्ध झाल्याने वाचक, वारकरी, संत साहित्याचे अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासह सर्वांसाठी मुक्ताई गाथा हा ग्रंथ मौलिक ग्रंथ आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांचे २५७ अभंग संकलित करून त्याचा अर्थ आणि त्यासोबतच मुक्ताईंचे चरित्र अशा पद्धतीचा ग्रंथ प्रथमच प्रसिद्ध झाल्याने वाचक, वारकरी, संत साहित्याचे अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासह सर्वांसाठी मुक्ताई गाथा हा ग्रंथ मौलिक ग्रंथ आहे. तो अनमोल ठेवा ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रकाशन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शारंगधर महाराज होते. व्यासपीठावर आमदार चैनसुख संचेती, अंबादास महाराज, लेखक अॅड. गोपाल चौधरी, सुलोचना चौधरी, प्रा.डॉ.आशालता महाजन, रामराव महाराज, लक्ष्मण महाराज, सुधाकर महाराज, सुरेश महाराज, त्र्यंबक महाराज, नारायण महाराज, तुकाराम महाराज, बी.आर.पाटील, भरत महाराज, कैलास महाराज यांची उपस्थिती होती.
प्रारंभी संत मुक्ताई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार करण्यात येवून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार यज्ञेश्वर आश्रमातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
लेखक अॅड.गोपाल चौधरी यांनी गाथा पूर्णत्वास येण्यामागील परिश्रम कथन करून त्यासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सुलोचना चौधरी यांनी पतीच्या अंधत्वानंतर त्यांची रायटर होऊन मुक्ताईंच्या अभंगाचा अर्थ लिहिण्याचे काम लिहिण्यासाठी निमित्तमात्र झाल्याचे सांगितले. प्रा.डॉ.आशालता महाजन यांनी संत साहित्याचा आढावा घेऊन मुक्ताईदी चारही भावंडांचा जगाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचे महत्व कथन केले व विद्यार्थी डॉ.जगदीशचे लेखन प्रथमच पुस्तकात समाविष्ट झाल्याबद्दल कौतुक केले. प्रकाशक लक्ष्मण महाराज यांनी गाथ्यात पंचसंवाद असल्याचे सांगून मुक्ताईंचे साहित्य वाचकांपर्यंत नेण्यात प्रकाशक म्हणून मुक्ताईंचा आशीर्वाद मिळाल्याचे सांगितले. तसेच इतर संतांच्या गाथ्याप्रमाणे मुक्ताई गाथ्याचे पारायण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार संचेती यांनी दृष्टी नसलेल्या दृष्ट्या माणसाने भाविकांसाठी हा अनमोल ठेवा तयार केला असून वारकरी सांप्रदायामध्ये हा ग्रंथ महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.
अंबादास महाराज मुक्ताईंचे सर्वश्रेष्ठत्व कथन करून चौधरी दाम्पत्याने केलेले कार्य अलौकिक असल्याचे सांगितले. सुधाकर महाराज यांनी मुक्ताई सार्थ गाथा प्रसिद्ध झाल्याचा सार्थ अभिमान झाल्याचे म्हटले. बी.आर. पाटील यांनी लेखक व प्रकाशकाचे कौतुक करून मुक्ताई गाथा मुक्ताईंचे तत्वज्ञान समजण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. व्ही.ओ. चौधरी यांनी आमच्या कलेचा पुस्तकात समाविष्ट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. रामराव महाराज यांनी शुभेच्छा व्यक्त करून शारंगधर महाराज यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याला निंबादेवी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज, ज्ञानदेव पाटील, मोहन शर्मा, विनोद गव्हाड, अशोक महाजन, पुष्कर चौधरी, हेमांगिनी चौधरी, संजय ताडेकर, मनीषा ताडेकर यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.
.