मुक्ताई पालखी सोहळ्याने घेतले पांडुरंगाच्या कळसाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:42 PM2020-07-01T17:42:01+5:302020-07-01T17:43:34+5:30
दरवर्षी आषाढीला लाखो वैष्णवाच्या उपस्थितीने गर्जणाऱ्या पंढरपुरात यंदा कोरोना सावटामुळे अवघे सुने सुने पंढरीत सकाळी साडेआठ वाजता मुक्ताई पालखी सोहळ्याने नगर प्रदक्षणा घालत श्री विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : आषाढी सोहळ्यानिमित्ताने शासन नियमाधीन राहून यंदा संत मुक्ताई पालखी सोहळा, बसने मोठ्या भक्तीभावाने मंगळवारी रात्री पंढरीत दाखल झाल्यानंतर बुधवारी सकाळी निस्सीम भक्तीच्या आनंदात संत मुक्ताबाई पादुकांचे सकाळी ८ वाजता चंद्रभागा स्नान झाले. दरवर्षी आषाढीला लाखो वैष्णवाच्या उपस्थितीने गर्जणाऱ्या पंढरपुरात यंदा कोरोना सावटामुळे अवघे सुने सुने पंढरीत सकाळी साडेआठ वाजता मुक्ताई पालखी सोहळ्याने नगर प्रदक्षणा घालत श्री विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले. उद्या गुरुवारी मुक्ताई पादुका श्री विठ्ठलाची भेट घेणार आहेत.
पायी वारीची परंपरा खंडित
कोरोना संकटामुळे दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा आषाढी सोहळा केवळ मानाच्या पालख्यांना पंढरीत प्रवेश देऊन साजरा करावा, असे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार पायी वारीची परंपराही यंदा खंडित झाली. कोरोनाच्या भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठरवत संत मुक्ताई यासह मानाच्या १० पालख्या मंगळवारी सायंकाळी बसमधून वाखरी तळावर पोहोचल्या.
मुक्ताई मठात विसावा
प्रत्येक पालख्यातील पादुकांसमवेत २० मानाचे वारकरी होते. बसमधून उतरल्यानंतर मानाच्या पालख्यांसमवेत असलेल्या भाविकांसाठी येथे काही काळ विसाव्यासाठी लहान मंडपाची उभारणी करण्यात आली होती. यावेळी जिल्हा प्रशासन, पंढरपूर पालिका, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत आरती करून भक्तीभावाने मुक्ताई पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. टाळ-मृदंगाचा गजर होऊन पुन्हा बसनेच मुक्ताई पालखी पुन्हा पंढरीत दाखल झाली आणि मुक्ताई मठात विसावा घेतला.
चंद्रभागेत पादुकांचे स्नान
‘चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी’ या आतुरतेत असलेल्या मुक्ताई पालखी वारकºयांनी प्रशासनाने दिलेल्या निर्धारित वेळेत सकाळी ८ वाजता मुक्ताई मठासमीप दत्त घाटावर पवित्र चंद्रभागेत संत मुक्ताई पादुका स्नान घडले. दरवर्षी हजारो वैष्णवांच्या गर्दीत होणारी चंद्रभागेच्या पाण्यातील पावन करणारी बुडकी यंदा सुनी सुनी होती. मात्र पालखीत सामील २० वारकºयांनी या हजारो वैष्णवांच्या वतीने प्रातिनिधिक पुण्य स्नान केले.
मुक्ताई पालखीचे थाटात नगर प्रदक्षिणा
चंद्रभागेतील संत मुक्ताई पादुका स्नानानंतर मुक्ताई मठात पादुकांचे विधीवत पूजन पार पडले आणि मोठ्या स्वरूपातील पोलीस फौज फाट्यात मुक्ताई पालखीने थाटात पंढरीत नगर प्रदक्षणा घातली. पंढरी वैकुंठ, रीते वाळवंट, दाटला से कंठ, पांडुरंगा' या आर्त ओढीने आषाढी वारीला कोरोनाच्या संकट काळात ‘कानडा राजा श्री विठ्ठला’च्या कळसाच्या दर्शनाचा आनंद घेतला आणि नगर प्रदक्षिणेनंतर पालखी पुन्हा मुक्ताई मठात विसावली.
हभप रवींद्र महाराज यांचे कीर्तन
मुक्ताई पालखीची जरी यंदा कोरोना संकटाने पायी वारी झाली नसली तरी मुहूर्तावरच्या प्रातिनिधिक प्रस्थानापासून मुक्ताई पादुकांची सेवा व दैनंदिनी नेहमीप्रमाणे सुरू आहे. याचाच भाग म्हणून मुक्ताई मठात दुपारी हभप रवींद्र महाराज हरणे यांचे कीर्तन झाले आणि हरीपाठ कीर्तनही पार पडले.
माऊलीकडून साडी-चोळी भेट
दरवर्षी वाखारीत होणारी संत मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर माऊलीची भेट यंदा मात्र आषाढीच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास माऊलीच्या पादुकांचे प्रत्यक्ष मुक्ताई मठात आगमन होऊन ज्ञानरायाकडून मुक्ताईस साडीचोळी भेट देण्यात आली. या भेटीचा सोहळा इतिहासात प्रथमच मुक्ताई मठात घडला. याप्रसंगी दोन्ही पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थितीत होते.
पांडुरंगाची भेट गुरुवारी
पांडुरंगाच्या कळसाचे दर्शन बुधवारी घेतल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर मुक्ताई पालखी सोहळ्याला सायंकाळपर्यंत श्री विठ्ठल मंदिरात प्रवेशाची प्रतीक्षा होती. परंतु प्रशासनिक आदेश मिळाले नसल्याने उद्या गुरुवारी मुक्ताई पादुकांचे श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश होईल आणि मुक्ताई श्री विठ्ठलाच्या भेटीचा सोहळा रंगेल.
पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्या
एक दिवस अगोदर माघारी परतण्याबाबत प्रशासनाकडून सूचना सर्व पालखी प्रमुखांना सूचना देण्यात आल्या. यानंतर सर्व पालखीप्रमुखांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मठात बैठक घेतली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विकास ढगे पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानप्रमुख योगेश देसाई, निवृत्तीनाथ महाराज, संजयनाना धोंडगे, मुक्ताई संस्थानचे प्रमुख रवींद्र पाटील, रवींंद्र महाराज हरणे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होती.
आषाढी यात्रेसाठी सर्व नियम अटी पूर्ण करून आलेल्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आल्या आहेत. दिलेल्या वेळेच्या २ जुलै रोजी माघारी प्रस्थान करण्याचा रेटा प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. यामुळे सर्व पालखीप्रमुखांनी श्री संतांच्या पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्या. सर्व पालखी सोहळ्यासह आलेल्या भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेळ मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्याचे या बैठकीत ठरले.