मुक्ताई पालखी पंढरीच्या दारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:06 PM2020-06-30T22:06:44+5:302020-06-30T22:08:35+5:30
संत मुक्ताबाई आषाढी पालखी मंगळवारी पहाटे चारला संत मुक्ताई नवीन मंदिर येथून लक्झरी बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाली.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : संत मुक्ताबाई आषाढी पालखी मंगळवारी पहाटे चारला संत मुक्ताई नवीन मंदिर येथून लक्झरी बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाली. सायंकाळी सहाला पालखी पंढरपुरात दाखल झाली. येथून वाखारी येथे पोहचली.
तेथूनच ज्ञानेश्वर माऊलीसह मानाच्या नऊ पालखी सोहळ्यांसोबत रात्री पंढरपुरात दाखल झाली असून, संत मुक्ताई मठात विसावली आहे. मुक्ताईच्या हजारो भाविकांचे प्रतिनिधित्व करीत अवघे २० वारकरी या पालखी सोहळ्यात सामील आहेत.
‘बस चालती पंढरीची वाट...’
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शतकांची परंपरा असलेल्या श्री संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळा यंदा प्रथमच लक्झरी बसने भू वैकुंठ पंढरीला दाखल झाला आहे.
सोमवारी सायंकाळी जुने कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर येथून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले होते.
रात्री नवे मुक्ताई मंदिर येथे मुक्काम व मंगळवारी पहाटे ४ वाजता खासगी लक्झरी बसने मुक्ताई पालखी पादुका २० वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आणि रात्रीला मुक्ताई मठात पालखी सोहळा पोहोचला. यंदा पायी वारी नव्हे तर बसने आषाढी पालखी सोहळा पांडुरंग नगरीत दाखल झाला.
विधीवत पादुका पूजनाने बसच्या प्रथम मुख्य सीटला सजवून संत मुक्ताईच्या पादुका मोठ्या थाटात भक्तीभावाने आणि संपूर्ण मार्गात टाळमृदुंगाचा गजर भजन कीर्तन, हरिपाठ अखंडपणे सुरू होते. जळगाव पोलीस दलाचे अधिकारी एक वाहनात, तर पाच कर्मचाºयांचे संरक्षण लक्झरी बससोबत होते.
२० वारकरी सहभागी
संत मुक्ताबाई संस्थानने स्वखर्चाने लक्झरी बस करून मुक्ताई पादुका पालखी पंढरपूर येथे नेली आहे. संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अॅड.रवींद्र प्रल्हादराव पाटील,पालखी सोहळाप्रमुख रवींंद्र गजानन हरणे, विश्वस्त नीळकंठ उत्तम मारके, पंजाबराव प्रल्हादराव पाटील, नरेंद्र विश्वनाथ नारखेडे, सम्राट पंजाबराव पाटील, विशाल खोले, राम उद्धव जुणारे, ज्ञानेश्वर विनायक हरणे, धनराज नीळकंठ मारके, लखन उत्तम पाटील, अमोल रवींद्र पाटील, नितीन बाळकृष्ण अहिर, विजय भास्कर खवले, पंकज रंगनाथ पाटील, दीपक सुभाष पाटील, समाधान उत्तम पिंपळे, ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील, अक्षय चंद्रकांत भोसले, अमोल पीतांबर पाटील या वारकºयांचा दिंडीत समावेश आहे.
रात्रीस कीर्तन रंगले : मंगळवारी रात्री मुक्ताई पादुका पालखी मुक्ताई मठात पोहोचल्यानंतर परंपरेप्रमाणे विधीवत पूजन पार पडले व रात्री कीर्तन रंगले.
आज पांडुरंगाच्या दरबारात
बुधवारी सकाळी शासनाकडून मिळालेल्या निर्धारित वेळेला संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान होणार आहे. यानंतर श्री विठ्ठल मंदिरात निर्धारित वेळेत प्रवेश करून पांडुरंग दरबारी पादुकांचे श्री विठ्ठलाचे दर्शन घडणार आहे. यावेळी पादुका पालखीचे मंदिर प्रदक्षिणा होणार आहे.
या पालखी सोहळ्यात सामील २० वारकºयांची पहिली आरोग्य तपासणी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर पंढरपूर सीमेवर पुन्हा आरोग्य तपासणी करण्यात आली, तर उद्या बुधवारी आषाढी एकादशीला मंदिरात प्रवेशाच्या आधी पुन्हा आरोग्य तपासणी होणार आहे.