मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई पालखीचे १८ रोजी प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:57 PM2018-06-01T18:57:24+5:302018-06-01T18:57:24+5:30
महाराष्ट्रातील सात मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एक असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे यंदाच्या पंढरपूर येथील आषाढ वारीसाठी १८ जून रोजी सकाळी दहा वाजता प्रस्थान होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.१ : संपला सोहळा नावडे मनाला! लागला टकळा, पंढरीचा!
जावे पंढरीसी आवडे मनासी!
कधी एकादशीच्या आषाढी हे !
या उक्तीनुसार महाराष्ट्रातील मानाच्या प्रमुख सात पालख्यातील एक असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूर आषाढी वारीसाठी येत्या १८ जून, सोमवार रोजी समाधीस्थळावरून प्रस्थान होणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी पंढरपूर येथे महाराष्ट्रातील प्रमुख मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्या व लाखो वारकरी लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पायी येण्याची परंपरा आहे. संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथून ३०९ वर्षांपासून जाणाऱ्या मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रस्थान १८ जून रोजी सकाळी १० वाजता जुने मुक्ताबाई मंदिरातून विधिवत पादूका पूजन करून आणि हजारो वारकरी, भाविकांच्या उपस्थितीत होईल. शहरातून नविन मंदिरात दुपारी विसावा घेवून पहिल्या सातोड मुक्कामी पालखी रवाना होईल.
मलकापूर, बुलढाणा, चिखली, जालना, बीड, भूम, माढामार्गे असा ३४ दिवसांचा पायी प्रवास करीत २० जुलैला पंढरपूर येथे पालखी पोहोचेल. पालखीत भाविकांच्या सोयीसाठी संस्थानकडून सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.
वारीसोबत येणाºया इच्छुक भाविकांनी १७ रोजी जुने मंदिर कोथळी येथे हजर राहून नावनोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष रविंद्र पाटील , पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांनी केले आहे.