मुक्ताईनगरात विद्युत तार तुटून उपकरणे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 06:41 PM2020-08-08T18:41:29+5:302020-08-08T18:42:22+5:30
३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक तार तुटून घरात झालेल्या स्फोटात दोन घरातील विद्युत उपकरणांचे जवळपास चार लाखाचे नुकसान झाले
मुक्ताईनगर, जि.जळगाव : ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक तार तुटून घरात झालेल्या स्फोटात दोन घरातील विद्युत उपकरणांचे जवळपास चार लाखाचे नुकसान झाले असून, यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ५ रोजी ही घटना घडली.
शहरातील वरणगाव रस्त्यावरील साई गजानन नगरातील शेवटच्या भागात शनिमंदिराच्या मागे राहणाऱ्या सुनीता प्रमोद भालेराव व किशोर हरी खैरनार या दोन रहिवाशांची घरे आहेत. या घरांवरून विद्युत केंद्राला जोडणाºया ३३ केव्ही लाईनच्या मुख्य विद्युत वाहक तारा गेलेल्या आहेत. घराच्या संडास बाथरुमला टेकून या उच्च क्षमता वाहिनीच्या तारा स्पर्शून गेलेल्या आहेत. ५ आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीनला या विद्युत वाहिनीचे तार अचानक तुटून पडले. तार घरावर पडल्यानंतर घरातील विद्युत जोडणीशी कुठेतरी संपर्क आल्याने स्फोट दोन्ही घरांमध्ये झाला. विशेष म्हणजे जवळपास दोनशे मीटरपर्यंत घरातील विविध उपकरणे जळून खाक झाला. विशेष म्हणजे एक दिवस आधीच या विद्युत वाहक तारामध्ये वीज प्रवाह सुरू करण्यात आला होता. बांधकाम करण्यापूर्वीच १२ नोव्हेंबर २०१२ रोजी रहिवाशांनी विद्युत वितरण कंपनीला तार काढण्यासंदर्भात अर्ज दिलेला होता. तरीही तार न काढल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत दोन्ही घरातील तीन कुलर, १२ पंखे, दोन फ्रिज, दोन टीव्ही आणि सेट-टॉप-बॉक्स, दोन वाशिंग मशीन, दोन गिझर, दोन मिक्सर, दोन वॉटर फिल्टर, जवळपास आठ ते दहा स्वीच बोर्ड, घरातील सर्वच सीएफएल बल्ब आणि संपूर्ण वायरिंग केलेली फिटिंग जळून खाक झाली आहे. एवढेच नव्हे तर विद्युत मीटरही जळून खाक झाले आहेत. भालेराव यांचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपये आणि खैरनार यांचे जवळपास दीड ते दोन लाख रुपये असे चार ते साडेचार लाखांचे दोघांचे नुकसान झाले आहे.
-महेश चौधरी, उपअभियंता, वीज कंपनी कार्यालय, मुक्ताईनगर
विद्युत उपनिरीक्षक जळगाव यांच्याकडे संबंधित घटनेची माहिती दिली आहे. ते आल्यानंतर पाहणी केल्यावर अहवाल तयार केल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल