मुक्ताईनगर नगर पंचायत निवडणूक : आरोप- प्रत्यारोपांचा रंगतोय फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:19 PM2018-07-14T13:19:27+5:302018-07-14T13:20:02+5:30

एकनाथराव खडसे मैदानात उतरल्याने प्रचारात रंगत

Muktainagar Nagar Panchayat Election: Charges - Rangotoy Phad of Opinions | मुक्ताईनगर नगर पंचायत निवडणूक : आरोप- प्रत्यारोपांचा रंगतोय फड

मुक्ताईनगर नगर पंचायत निवडणूक : आरोप- प्रत्यारोपांचा रंगतोय फड

Next
ठळक मुद्देएक चर्चा अशीही काँग्रेसला भाजपची रसद

चुडामण बोरसे
जळगाव - मतदान जसे जसे जवळ येत आहे, तसा मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपांचा फड रंगू लागला आहे. यात भर म्हणून आमदार एकनाथराव खडसे हे स्वत: मैदानात उतरल्याने निवडणुकीत आणखीनच रंग भरला आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी रविवार १५ रोजी मतदान होत आहे. पावसामुळे दि.९ ते ११ जुलै या दरम्यान मंदावलेला प्रचार आता १२ पासून जोमात सुरु झाला आहे. भाजपच्यावतीने आमदार एकनाथराव खडसे व शिवसेनेच्यावतीने चंद्रकांत पाटील हे कॉर्नर सभा आणि व्यक्तीगत भेटीगाठी घेत आहेत. प्रचाराच्या सुरुवातीला भाजप सर्वात पुढे होता आणि ती जागा शिवसेनेने घेतली होती. त्यावर मात करण्यासाठी भाजपनेही आपली टीम प्रचारात उतरवली आहे. त्यात खासदार रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, फैजपूरचे डालू शेट यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर आदी प्रचारासाठी फिरत आहेत. यासाठी पडद्याआडून प्रा. सुनील नेवे आणि खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते हे नियोजन करीत आहेत. आमदार खडसे हे स्वत: दिवसातून चार ते पाच कॉर्नर सभा घेत आहेत.
शिवसेनेला मतदारांची सहानुभूती आहे पण ती परिस्थिती हा पक्ष कॅश करु शकलेला नाही. पडद्यामागे कुणी असा प्रतिष्ठित आणि विश्वासू चेहरा या पक्षाकडे नाही. चंद्रकांत पाटील या एकखांबी तंबूवर सर्व भार आहे. हा भार समर्थपणे सांभाळत ते भाजपाशी लढत आहेत. उलट जिल्हा नेत्यांकडून मदतीची विचारणा झाल्यावर चंद्रकांत पाटील यांनी त्यास नम्रपणे नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सध्या तरी एकला चलो रे चे धोरण आहे.
काँग्रेसच्यावतीने डॉ. जगदीश पाटील हे सूत्रे सांभाळत आहेत. स्वत: जगदीश पाटील हे पूर्वी भाजपमध्ये होते. यानंतर मनसे आणि आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. मुक्ताईनगर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज या पक्षाकडून १७ पैकी केवळ सातच उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या पक्षानेही प्रचारात गती घेतल्याचे दिसत आहे. मात्र त्याचे मतांमध्ये किती रुपांतर होईल, यासाठी २० जुलैची वाट पहावी लागणार आहे.
राष्टÑवादी काँग्रेसकडून तीनच उमेदवार निवडून लढवित आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी सदस्य विनोद तराळ आनंदराव देशमुख, ईश्वर राहणे आदी मुक्ताईनगरात तळ ठोकून आहेत.
विकासाचा मुद्दा वरील तीनही पक्षांकडून मांडला जात आहे. पाऊस पडला की गावातील अनेक रस्त्यांवर चिखल होत आहे. याचे भांडवल करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि काँग्रेसकडून केला जात आहे. भाजपाने ३० वर्षात काहीच केले नसल्याचे सांगितले जात आहे. एवढे सगळे असले तरी एकनाथराव खडसे हेच मुक्ताईनगरचा विकास करु शकतात, ही एक भावनाही लोकांच्या मनात आहे.
नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमाती (महिला) राखीव आहे. यात भाजपाच्या नजमा इरफान तडवी, शिवसेनेच्या ज्योती दिलीप तायडे आणि काँग्रेसच्या माधुरी आत्माराम जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे. नगराध्यक्षपदाच्या तीनही उमेदवारांची कोरी पाटी आहे. त्यामुळे सध्या तरी हे उमेदवार पक्षाच्याच प्रचारावर अवलंबून आहेत.
एक चर्चा अशीही काँग्रेसला भाजपची रसद
काँग्रेसला भाजपकडून रसद पुरविली जात असल्याची चर्चा मुक्ताईनगरात आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा या पक्षावर टीकाही केली जाते. यावर काँग्रेसचे डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, निवडणुकीत असले आरोप होत असतात. मात्र आम्ही स्वबळावर लढत असतो, हे आरोप करणाºयांनी लक्षात घ्यावे. आम्ही एकनिष्ठ आहोत, कुणाच्या दबावाखाली नाही... असा टोलाही त्यांनी शिवसेनेला मारला.
या रसदबाबत खडसे विचारले असता आमदार खडसे म्हणाले की, काँग्रेसला रसद पुरवून आम्ही आमचे पैसे का म्हणून वाया घालवायचे. रसदच्या या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
विरोधक आहेच कुठे? - खडसे
‘मुक्ताई’ या निवासस्थानी आमदार एकनाथराव खडसे यांची भेट घेतली असता ४० ते ५० लोक तिथे आधीच थांबलेले होते. खडसे म्हणाले की, गावातील रस्ते आणि गटारींसाठी यापूर्वीच १९ कोटी रुपये मंजूर आहेत. ग्रामपंचायत असताना निधीसाठी काही मर्यादा येत होत्या. विरोधकांनी शुद्ध पाण्याचा मुद्दा उपस्थित केला यावर बोलताना ते म्हणाले की, विरोधक आहेच कुठे... पूर्वीच्या पाणी पुरवठा योजनेत आता तिपटीने वाढ झाली आहे. नगरोथ्थान योजनेत १५ ते १६ कोटी रुपये मिळणार आहेत. यासाठी एक व्हीजनच तयार केले आहे.
किती कोटी आणले ते सांगा- चंद्रकांत पाटील
कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याचे नेते असूनही आमदार खडसे हे मुक्ताईनगरच्या बाहेर जाऊ शकत नाही, यातच सर्व काही आले. आमच्याकडे पक्ष संघटनेची ताकद आहे. त्यामुळे भाजपचे लोक अस्वस्थ आहेत, यातच आम्हाला समाधान आहे. मुक्ताईनगरच्या विकासासाठी कधी १७ कोटी तर कधी १९ कोटी आणल्याचे सांगितले जात आहे. नेमके किती आले हे आधी सांगून टाका... असेही ते म्हणाले.
रस्त्याचे ठेके कुणाचे आहेत- डॉ. जगदीश पाटील
काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे डॉ. जगदीश पाटील यांनी तर थेट शिवसेनेचेच आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. रस्त्याचे ठेके कुणाचे आहेत, याचा खुलासाही शिवसेनेने करायला हवा. ठराविक लोकांनाच ठेके मिळाले आहेत. ही सुध्दा एक प्रकारची लूटच आहे. आमच्यासाठी तर शिवसेना हा विषयच नाही. शिवसेना भाजपवर आरोप करीत असली तरी यापूर्वी त्यांचे सदस्य निवडून आले आहेत, त्यांनी काय विकास केला हे लोकांना माहित आहे.
अशी आहेत बलस्थाने
भाजप
भाजपकडे आज मुक्ताईनगर पीक संरक्षक संस्था, विविध कार्यकारी सोसायटीसह इतर महत्वाच्या संस्था आहेत. एवढेच नाही तर शैक्षणिक संस्थेत ६०० कर्मचारी कामाला आहेत. भाजपाने एक डिजिटल प्रचार व्हॅन तयार केली आहे. ठिकठिकाणी थांबूून या व्हॅनद्वारे आमदार एकनाथराव खडसे यांचे ध्वनीमुद्रीत भाषण ऐकवले जात आहे. गरजू माणसाला मदत हवी असेल तर स्वत: खडसे संबधित अधिकाºयाशी संपर्क साधत असतात. न मिळणारे मतदान भाजपकडे कसे वळवायचे यासाठी रोज अभ्यासवर्ग घेतला जात आहे. नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व म्हणजे १७ जागांवर या पक्षाने उमेदवार दिले आहेत.
शिवसेना
गावातील परिस्थितीचे भांडवल आणि आक्रमकता ही शिवसेनेची एक भक्कम बाजू. बेरोजगार युवक या पक्षासोबत आहेत. हाक मारताच ५० युवक सहज धावून येतात. अडल्या - नडल्या माणसाला सदैव मदतीचा हात तयार असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाचा पूर्णपणे उपयोग करुन शिवसेनेच्यावतीने मतदारांकडून मतदानाचे प्रात्यक्षिक करुन घेतले जात आहे. त्यासाठी एक मतदान यंत्रच तयार करण्यात आले आहे. १७ पैकी १३ जागांवर या पक्षाने उमेदवार दिले आहेत. उर्वरित तीन जागा आघाडीतील राष्टÑवादी काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत. तर एका प्रभागात अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले आहे.

 

Web Title: Muktainagar Nagar Panchayat Election: Charges - Rangotoy Phad of Opinions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.