मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : शिवसेनेने भूमिका बदलल्याने काँग्रेस रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:47 PM2018-07-04T12:47:38+5:302018-07-04T12:48:01+5:30
विनायकराव देशमुख यांची माहिती
जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने कॉंग्रेसच्या उमेदवाराचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी दिली.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, मनसे यांची महाआघाडी झाली असली तरी तेथे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व काँग्रेस दोन्हीही पक्षांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर विनायकराव देशमुख यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, महाआघाडी करताना शिवसेनेला जास्त जागा देणे व अध्यक्षपद कॉंग्रेसकडे ठेवणे असे चर्चेत ठरले होते. त्यानुसार शिवसेनेला ९ व काँग्रेसने सहा जागा वाटप करून घेतल्या.
अर्ज दाखल झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे काही तांत्रिक बाबीतून अडचणीत आणू शकतात, असे सांगत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व काँग्रेस असे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरून ठेवण्याचे सूचविले. त्यानुसार अर्ज दाखल करण्यात आले. मात्र ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांनी भूमिका बदलली व अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आम्हीही उमेदवारी कायम ठेवली, असे विनायकराव देशमुख यांनी स्पष्ट केले.
एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असता तर त्यास काँग्रेसने पाठिंबा दिला असता, मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर राज्यात चुकीचा संदेश जाईल, असेही देशमुख यांचे म्हणणे आहे.