मुक्ताईनगरात संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा २१पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 03:01 PM2019-05-18T15:01:00+5:302019-05-18T15:02:44+5:30
श्री संत मुक्ताबाईंच्या सातशे तेविसाव्या तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध संतांचे पालखी सोहळे, वारकरी दिंड्या मुक्ताईनगरात दाखल होणार आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : श्री संत मुक्ताबाईंच्या सातशे तेविसाव्या तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध संतांचे पालखी सोहळे, वारकरी दिंड्या मुक्ताईनगरात दाखल होणार असून, वैष्णवाचा मेळा जमणार आहे.
७२३ वर्षांपूर्वी वैशाख वद्य दशमी श्री संत मुक्ताबाईंनी विजेच्या प्रचंड कडकडाटात तिरोभूत समाधी घेतली होती. त्यावेळी प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा, संत नामदेव संत निवृत्तीनाथ महाराज आदी संत मंडळी हजर होती.
श्री संत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) समाधीस्थळ येथे परंपरेने समाधी सोहळा साजरा होत असतो. वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज मानकर यांनी घालून दिलेल्या परंपरेने २१ मेपासून दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ, मान्यवरांची कीर्तने इ. भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्त्व हभप संदीपान महाराज मोतेकर हे करतील. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध देवस्थानप्रमुख, विश्वस्त व मुक्ताबाई फडावरील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. २९ रोजी पहाटे समाधी सर्व सहभागी पादुकांना महापूजा, अभिषेक अॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी साडेदहा ते साडेबारा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विद्यमान वंशज हरिभक्त पारायण गुरुवर्य केशवदास नामदास महाराज यांचे समाधी सोहळा गुलालाचे कीर्तन होईल. रात्री संत निवृत्तीनाथ संस्थान अध्यक्ष हभप पंडित महाराज कोल्हे यांचे मानाचे कीर्तन होईल.
या कार्यक्रमासाठी राज्यभरातून वारकरी दिंड्यांसमवेत भाविक येत असतात. पंढरपूर येथून पांडुरंगाचा व संत नामदेव पालखी सोहळा व त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पादुका पालखी सोहळा २७ रोजी मुक्ताईनगरकडे प्रस्थान करणार आहे. सर्व पालखी सोहळे २९ रोजी मुक्ताईनगर समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. भाविकांना संतांच्या दर्शनाचा लाभ यानिमित्ताने घडणार आहे.
श्री पांडुरंगाच्या पादुका पालखीचे जिल्ह्यातील कार्यक्रम
श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी भेट सोहळा २८ रोजी दुपारी १२ वाजता जामनेर येथील सावता विठ्ठल मंदिरात होईल. सायंकाळी पाच वाजता भुसावळ येथे नाहटा कॉलेजजवळ संत निवृत्तीनाथ महाराज व श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा भेट होईल. नंतर मिरवणुकीने विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे मुक्कामी राहील. येथे भुसावळच्या भाविकांना दर्शन घेता येईल.
२९ रोजी सकाळी वरणगाव येथे विसावा घेऊन सोहळा कोथळी येथे दाखल होईल.
जास्तीत जास्त भाविकांनी जामनेर, भुसावळ, वरणगाव येथे दर्शनाचा लाभ घ्यावा व मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी येथील सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील व हभप रवींद्र महाराज हरणे यांनी केले आहे, असे व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे कळविले आहे.