मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी देताहेत स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉय म्हणून रुग्ण सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:23 PM2020-09-20T17:23:24+5:302020-09-20T17:24:04+5:30
तीन सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयची रुग्ण सेवा देत आहेत.
मतीन शेख
मुक्ताईनगर : अपूर्ण मनुष्य बळाने झुंजणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्पुरती नेमणूक झालेल्या वार्ड बॉय कर्मचाऱ्यांनी भीतीने पोबारा केला आहे. नेमणूक झालेल्या पाचपैकी फक्त एक वार्ड बॉय येथे कार्यरत असून, रुग्ण सेवा देण्यासाठी तीन सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयची रुग्ण सेवा देत आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर शहरात उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोविड डेडीकेटेड केअर सेंटर अशा स्वरूपात स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर, सेमी व्हेंटिलेटर, आॅक्सिजन आणि औषधोपचार अशा स्वरूपात रुग्णांवर उपचार केले जात आहे. आज रोजी ३५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दर दिवसाला कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ज्या बाधितांना तातडीचे व अत्यावश्यक उपचार गरजेचे आहेत असे रुग्ण या ठिकाणी भरती आहेत. एकीकडे रुग्ण वाढ, उपचाराचा ताण तर दुसरीकडे अपूर्ण कर्मचारी संख्या यातून मार्ग काढत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे या कक्षासाठी आवश्यक असलेले वार्ड बॉय संख्याच नसल्याने समस्या गंभीर आहे. सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयची रुग्ण सेवा देऊन मोठी मदत करीत आहे.
वार्ड बॉयचा पोबारा
जिल्हास्तरावरून आपत्कालीन स्थितीत येथे आॅगस्ट महिन्यात तीन वार्ड बॉयची नेमणूक करण्यात आली होती. तीनपैकी २ वार्ड बॉय हजर तर झाले, पण कोरोनाच्या भीतीने त्यांनी पोबारा केला. ते परत आलेच नाही. नंतर स्थानिक स्तरावर तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक यांच्या स्थानिक समितीला अधिकार बहाल करीत स्थानिक पातळीवर वार्ड बॉय पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे अधिकार देण्यात आल.े त्यात २ वार्ड बॉय पदे भरण्यात आली. यातही एक नवनियुक्त वार्ड बॉय भीतीपोटी आलाच नाही.
एकाला कोरोना, दुसरा जखमी
दरम्यान, सद्य:स्थितीत एक स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयचे काम करणाºया प्रशांत मदारी हा कर्मचारी रुग्णास आॅक्सिजन लावण्यापूर्वीची तयारी करताना झालेल्या अपघातात जखमी झाला, तर अविनाश तायडे या वार्ड बॉयला कोरोना संसर्ग झाल्याने तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. आज रोजी विक्की पाटील हा एकमेव वार्ड बॉय येथे आहे.
सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदतीला
वार्ड बॉय कर्मचारी नसल्याने येथे कार्यरत सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने वार्डबॉयचे काम करून डॉक्टर, नर्स पाठोपाठ रुग्णांना मदत करीत आहे. तुषार चौधरी, उमेश चौधरी, रामभाऊ जंगले आणि स्वच्छता कर्मचारी महेंद्र जावे हे आपल्या नियमित कामाव्यतिरिक्त वार्ड स्वयंस्फूर्तीने मध्ये सेवा देत आहेत.
जळगाव येथून नियुक्त करण्यात आलेले तीनपैकी २ वार्ड बॉय परतले नाही, तर स्थानिक समितीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले दोनपैकी फक्त एक वार्ड बॉय कामावर आहे. पूर्वीपासून कामास असलेल्या २ वार्ड बॉयपैकी एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर दुसरा जखमी आहे. सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदत मोलाची होत आहे.
-डॉ.शोएब खान, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर