मुक्ताईनगरचा कोरोना रिकव्हरी रेट ७५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:04 PM2020-08-19T15:04:35+5:302020-08-19T15:08:58+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.७५ टक्के इतका ठरला आहे
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्गजन्य आजारात १९ आॅगस्टअखेर तालुक्यातील ३२४२ रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली असून, ५६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४२८ रुग्ण उपचारा अंती कोरोना मुक्त झाले आहेत, तर १२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.७५ टक्के इतका ठरला आहे
तालुक्यात कोरोना संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण जून महिन्याच्या प्रारंभी मिळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत तालुक्यात कोरोना संक्रमण रुग्ण शोधले जात आहे. संसर्ग आटोक्यात नसला तरी जिल्ह्यात बोदवड तालुक्यानंतर सर्वात कमी ५६५ रुग्ण मुक्ताईनगर तालुक्यात गणले जात आहे. आज रोजी मुक्ताईनगर शहरात ३३, तर ९४ ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. शहरात २१, तर ग्रामीण भागात ४९ असे ७० कंटेंटमेन्ट झोन सद्य:स्थितीत आहे.
पॉझिटिव्हचे प्रमाण १७.४ टक्के
जून महिन्यापासून १९ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील ३२४२ संशयित रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १७६४ रुग्णांची प्रथम धुळे व नंतर जळगाव येथे आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यात ३०० रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले.
आरटीपीसीआर तपासणीत पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याचे प्रमाण १७ टक्के इतके राहिले तर दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात १३ जुलै ते १९ आॅगस्ट दरम्यान १४७८ कोविड १९ रॅपिड अँटीजन तपासण्या करण्यात आल्या. यात २६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अँटीजेन तपासणीत पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याचे प्रमाण १७.९२ टक्के इतके आहे. एकंदरीत, पॉझिटिव्ह रुग्ण सरासरी प्रमाण १७.४ इतके ठरले आहे.
रिकव्हरी रेट ७५.७५ टक्के
दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या ५६५ रुग्णांपैकी ४२८ रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट ७५.७५ टक्के इतका ठरला आहे, तर १० रुग्ण कोरोनामुळे मृत्यू पावले असून, आज मितीला तालुक्यातील कोरोना रुग्ण मृत्यू दर हा १.८३ टक्के आहे.
१२७ रुग्ण अॅक्टिव्ह
आज रोजी तालुक्यात १२७ रुग्ण अॅक्टिव्ह असून या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २ रुग्ण जळगाव कोविड हॉस्पिटलला, ८ रुग्ण डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, २६ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात, ७८ रुग्ण शहरातील दोन कोविड केअर सेंटरमध्ये, तर २ रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय ११ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
तालुक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सर्वेक्षण सातत्याने सुरू आहे. कोरोना संक्रमित रुग्ण तत्काळ शोधण्यात यश मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालय पाठोपाठ चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन तपासणी सुरू आहे. पॉझिटिव्ह आलेल्या ५६५ रुग्णांपैकी ४२८ रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे.
-डॉ.नीलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुक्ताईनगर