मुक्ताई-भवानी संवर्धन प्रदेशात धोकाग्रस्त रान गवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:58 AM2019-04-08T00:58:20+5:302019-04-08T00:58:42+5:30
वन्यजीव-प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या जळगाव येथील न्यू कॉन्झर्व्हर या सेवाभावी संस्थेचे चेअरमन व माजी मानद वन्यजीव रक्षक अभय प्र. उजागरे या दुर्मीळ झालेल्या रान गव्याबद्दल लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...
‘रानगवा’ इंग्रजीमध्ये ‘द गौर’, शास्त्रीय नाव - ‘बॉस गौरस’ हा खुर असलेल्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या परिवारातील म्हणजेच ‘बोव्हिडे’ परिवारातील किंवा कुटुंबातील ‘बोव्हिने’ या उपकुटुंबातील प्रजातीचा, भारतातील सगळ्यात मोठा वन्यप्राणी.
गवा किंवा रानगवा हा भारतात मुख्यत: पहाडी वन्य प्रदेशात वावरणारा प्राणी आहे. भारतात आसाम, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात अमरावती, अकोला, नागपूर, चंद्र्रपूर, भंडारा, गडचिरोली, कोकणचा कर्नाटक हद्दीजवळचा भाग, कोल्हापूरचा सीमावर्ती भाग मुख्यत्वे या भागात आढळतो. कर्नाटक, आंध्र प्रदेशाचा काही भाग, तामिळनाडू, केरळ या राज्यांच्या भूभागात गवा आढळतो.
गवा हा मुख्यत: शाकाहारी प्राणी आहे. गवत हे त्याच्या आहाराचा मुख्य भाग असले तरीपण तो बांबूची पाने, काही खुरटी झुडपे व झाडे यांची पाने, कोवळे कोंब, कोवळ्या फांद्या खातो. मी अनेकदा उन्हाळ्यात खाद्याची कमतरता असताना गव्याला मोठ्या वृक्षांची साल ओरबाडून काढून खाताना पाहिले आहे. गव्यांना भरपूर खाद्य लागते. त्यामुळे ते सकाळी उन्हाचा तडाखा वाढेपर्यंत चरतात. तसेच सायंकाळी ऊन उतरू लागल्यावर अंधार पडेपर्यंत चरत असतात. भरदुपारी उन्हाचा तडाखा असताना मात्र ते सावलीत विश्रांती घेतात. हिवाळा आणि पावसाळ्यात कोणताही त्रास नसेल तर ते भरदुपारीदेखील चरताना दिसतो. गवे मुख्यत्वे सदाहरीत, मिश्र सदाहरीत तसेच पानगळीच्या जंगलात आढळतात. गवे पर्वत-रांगा, दऱ्याखोऱ्यांत वावरतात.
गवा हा एक मोठा प्राणी आहे. नर गवा मादीपेक्षा आकाराने मोठा असतो. पूर्ण वाढलेल्या नर गव्याचे वजन अंदाजे ८०० ते ९०० किलोपर्र्यंत असते आणि खांद्याजवळ त्याची उंची साडेपाच ते सहा फूट असते, पूर्ण वाढ झालेल्या नर गव्याचा रंग काळा ते गर्द काळा असतो. नवजात पाडसाचा रंग प्रथम सोनेरी पिवळा आणि वय वाढत जाते तसतसा तपकिरी होत जातो. गव्याच्या डोळ्यांचा रंग तपकिरी असतो. गव्याची विशेषत: नर गव्याची शिंगे चांगलीच मोठी असतात. ती पिवळसर पांढºया रंगाची, मात्र टोकाजवळ काळ्या रंगाची असतात. त्यांची धडक जबरदस्त असते. १९८७ साली ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका बिथरलेल्या नर गव्याने वन विभागाच्या जीपला धडक मारून उलथवलेले मी आणि माझ्याबरोबरच्या काही मित्रांनी पाहिले आहे. ज्या वेगाने, त्वेषाने आणि ताकदीने त्याने धडक मारली ते भयावह होते. एरव्ही काही त्रास दिला नाही तर गवा हा एक शांत वन्यप्राणी आहे. गव्याच्या पाठीवर, खांद्यावर एक मोठा उभार असतो. तसेच दोन उभार त्यांच्या मस्तकावर शिंगांच्या मध्ये असतात. गव्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण खुण म्हणजे गुडघ्यांपासून खाली खुरांपर्यंत त्यांच्या पायांचा रंग पांढरा असतो. जसे काही पांढरे मोजे घातलेत. पूर्ण वाढ झालेले नर गवे बरेचदा कळपातून वेगळे होऊन एकाकी जीवन जगताना आढळतात. मात्र पुनर्उत्पत्तीसाठी ते कळपात सामील होतात. (क्रमश:)
-अभय उजागरे, जळगाव