मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात रेडा झाला नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 07:48 PM2019-07-06T19:48:02+5:302019-07-06T19:51:15+5:30
पंढरीच्या वाटेवर असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याची झपाझप पाऊले पुढे सरकत असताना मोरगाव (जि.उस्मानाबाद) जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील एक भारदस्त रेडा पालखीला नतमस्तक होत होता हे दृश्य पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पंढरीच्या वाटेवर असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याची झपाझप पाऊले पुढे सरकत असताना मोरगाव (जि.उस्मानाबाद) जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील एक भारदस्त रेडा पालखीला नतमस्तक होत होता हे दृश्य पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला ।
हाच प्रत्यय मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात रेडा नतमस्तक झाल्याने मिळाला.
आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाची तीव्र ओढ व ऊन-पावसाची तमा न बाळगता ८ जून रोजी श्री संत मुक्ताई पालखी सोहळा हजारो वारकरी व भाविकांसह गेल्या २९ दिवसांपासून अखंड पायी चालत आहे.
तिसाव्या दिवसाचा मुक्काम उस्मानाबाद जिल्ह्यातील आष्टा या गावी होता. गावाच्या दिशेने निघालेली पालखी मोरगाव जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील एक भारदस्त रेडा पालखीला नतमस्तक होत होता. हे दृश्य पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले. पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज यांनी लागलीच या रेड्याला पालखी जवळ आणण्यास सांगितले. त्यानुसार एका शेतकºयाने रेड्याला रस्त्यावर आणत पालखी सोहळ्यातील आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन दिले, तर रेड्यानेही पालखीसमोर साष्टांंग दंडवत घातले. या घटनेचा प्रत्यक्ष व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
गेल्या वर्षी शेगाव पालखी सोहळ्यात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी चक्क हरण सामील झाले होते. याची प्रचिती रेड्याने करून दिल्याने भक्तीचा लळा माणसालाच नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येत आहे, तर संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविला होता. याची प्रचिती मोरगाव जवळ हजारो वारकºयांनी अनुभवली तर हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रूदेखील तरळले.
याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज, हभप नितीनदास महाराज, सदाशिव पाटील, ज्ञानेश्वर हरणे, अजय तळेले यांनी रेड्याला पुष्पहार घालून शाल व श्रीफळ देत सन्मान केला .