जळगावातील भाविकांसाठी स्वर्गारोहिणीनंतर मुक्तीनाथ यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:03 PM2018-05-19T14:03:53+5:302018-05-19T14:03:53+5:30
सिद्धी व्यंकटेश देवस्थान परिवाराचा आणखी एक उपक्रम
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१९ : जळगावच्या सिद्धी व्यंकटेश देवस्थानच्यावतीने स्वर्गारोहिणीनंतर आता मुक्तीनाथ (नेपाळ) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातील ३१० भाविक सोमवार २१ मे रोजी गोरखपूरकडे रवाना होत आहेत.
नेपाळमध्ये असलेले मुक्तीनाथ मंदिर हे समुद्र सपाटीपासून ३७१० मीटर उंच आहे. मुक्ती अर्थात मोक्ष या अर्थाने ही यात्रा आहे. २२ रोजी गोरखपूर येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आश्रमात मुक्काम करुन हे भाविक मुक्तीनाथ मंदिराकडे रवाना होतील.
१८ दिवसांच्या या प्रवासात भाविक भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनी, जनकपूरसह अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. याशिवाय २६ ते ३१ मे या दरम्यान मुक्तीनाथ येथे भागवत कथा होत आहे. अशा प्रकारची कथा मुक्तीनाथ मंदिराच्या परिसरात प्रथमच होत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. ७ जून रोजी भाविक जळगावला परततील.
जगभरातील १०८ दिव्य मंदिरापैकी मुक्तीनाथाचे एक मंदिर आहे. एवढेच नाही तर स्वर्गाच्या अष्टम द्वारापैकी मुक्तीनाथ हे एक आहे. तसेच ५१ शक्तीपीठांपैकी ते एक मानले जाते. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यामुळे या मंदिराचे नाव चर्चेत आले आहे.