मल्टी स्पेशालिस्ट सायकलची भुसावळात बांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 04:13 PM2019-06-15T16:13:13+5:302019-06-15T16:14:13+5:30
आजच्या काळात वाहतुकीसाठी विविध वाहनांचा वापर केला जातो. वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी या इंधनांचा वापर होतो. इंधन मर्यादित आहे. त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पेट्रोल व डिझेल यांच्या दरात नेहमीच वाढ होत आहे. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात भुसावळच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना यश आले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महिन्यांच्या संशोधनानंतर ‘हायब्रिड सायकल’ निर्माण केली.
भुसावळ, जि.जळगाव : आजच्या काळात वाहतुकीसाठी विविध वाहनांचा वापर केला जातो. वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी या इंधनांचा वापर होतो. इंधन मर्यादित आहे. त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पेट्रोल व डिझेल यांच्या दरात नेहमीच वाढ होत आहे. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात भुसावळच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना यश आले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महिन्यांच्या संशोधनानंतर ‘हायब्रिड सायकल’ निर्माण केली.
श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीतील जयेश भोई, गीतेश पाटील, सागर जोहरे, निखिल नेमाडे, पवन पालवे, मयूर तायडे, विवेक तायडे, क्रितिका सुडेले, निकिता सुडेले, गरीमा सिंग यांनी सहा महिन्यांच्या संशोधनानंतर हायब्रिड सायकल निर्माण केली.
सायकल चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जेसोबत आणि त्यासोबत अस्तित्वात असलेल्या वीज प्रवाहाचा वापर केला जाऊ शकतो. बॅटरी पॉवर संपली असल्यास आपण पैडलद्वारेदेखील तिला चालवू शकतो. २५ हजार रुपये खर्च आलेली ही सायकल प्रा.गौरव टेंभुर्णीकर व विभागप्रमुख प्रा.अजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली गेली आहे.
भविष्यात पेट्रोलपंपासारखे चार्जिंग स्टेशन तयार केले जावून अभियंत्यांना मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार मिळणार आहे, असे विभागप्रमुख प्रा.अजित चौधरी यांनी सांगितले.
प्रदूषण कमी करणाऱ्या अशा प्रकल्पांना शासनाने आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले पाहिजे.
या प्रकल्पात नवीन संशोधन करून सायकल अधिक सोयीस्कर बनवून स्वस्त करण्याचा प्रयन्त करणार आहोत, असे सागर जोहरे याने सांगितले. प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
७५ टक्के पैशांची बचत
या सायकलमध्ये इ- बाईक वीज मोटर, २४ व्होल्ट, ७ अॅम्पीइयर हव्हर बॅटरी, डायनॅमो, ४० वॅट सोलर प्लेट, पीडब्लूएम कंट्रोलरचा वापर केला आहे. सायकल ३० किलोमीटरपर्यंत प्रति तासाच्या गतीने धाऊ शकते. उदा. भुसावळ ते जळगाव सहज प्रवास शक्य होईल. कारण सोलरमुळे फ्री चार्जिंग होते किंवा वीज चार्जिंग केल्यास ३ युनिट म्हणजेच १२ रुपये खर्च येऊ शकतो. भुसावळ ते जळगाव एका फेरीसाठी ४० पेक्षा जास्त रुपये खर्च होतो. या प्रकल्पामुळे साधारणत: ७५ टक्के पैशांची बचत होते . शिवाय प्रदूषणसुद्धा होणार नाही.
पॉवर लॉकमुळे सायकल सुरक्षीत
पॉवर लॉक सिस्टीमच्या साहायाने चाबीमुळे सायकल सुरक्षित राहणार आहे. चोरी होण्याला आळा मिळेल किंवा बॅटरी सुरू किंवा बंद करणे सोयीचे ठरेल. हेड लाईट, बॅक लाईट इंडिकेटर, टर्निंग इंडिकेटर उपलब्ध केलेले असून हॉर्नसोबत गती दर्शवण्यासाठी डिजिटल स्पीडो मीटर लावण्यात आले आहे. एमपीपीटी सोलर चार्जे कंट्रोलरच्या मदतीने सोलर किरणे अधिक असलेल्या भागातुन ऊर्जा घेऊन बॅटरी चार्जे करते. गती कमी जास्त करण्यासाठी थ्रोटल वापरण्यात आले आहे.