'बहुरंगी यमन'ने परिवर्तन दशकपूर्ती उत्सवाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:11+5:302021-01-22T04:16:11+5:30
जळगाव : खान्देश तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून परिवर्तनची ओळख आहे. या संस्थेला गुरुवारी दहा वर्षे ...
जळगाव : खान्देश तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून परिवर्तनची ओळख आहे. या संस्थेला गुरुवारी दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गुरुवारी सायंकाळी भाऊंच्या उद्यानात दशकपूर्ती उत्सवाला अपर्णा भट यांच्या शिष्यांचा 'बहुरंगी यमन' या कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राम पवार, संदीप पाटील, अपर्णा भट, विजय पाठक, चंदू नेवे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना परिवर्तनची दहा वर्षे ही सांस्कृतिक स्थित्यंतराची दशकपूर्ती असून जळगाव शहरातील नाटक, संगीत, नृत्य, चित्र, साहित्य या सर्व कलांचा समुच्चय साधत उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती हेच परिवर्तनचे वैशिष्ट्य व उद्देश असल्याचे नारायण बाविस्कर यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी मंजुषा भिडे, सोनाली पाटील, प्रतीक्षा कल्पराज, हर्षदा कोल्हटकर, नीलिमा जैन, अनुषा महाजन, पालवी जैन, हर्षदा पाटील यांनी परिश्रम घेतले.
कथ्थक नृत्यविष्कार
प्रभाकर संगीत कला अकादमीच्या विद्यार्थिनी यमन रागातील गणेश वंदना, शिव वंदनासह विविध गाण्यांवर राग यमनमध्ये कथ्थक नृत्य सादर केली. भाऊंच्या उद्यानातील ॲम्पीथिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यात अपर्णा भट यांच्या मार्गदर्शनाखाली कोमल चव्हाण, मृणाल सोनवणे, ऋतुजा महाजन, हिमानी पिले, मृण्मयी कुलकर्णी, सानिका कानगो, आकांक्षा शिरसाळे, रिद्धी जैन, मधुरा इंगळे, वांङमयी देव यांनी कथ्थक नृत्य सादर केले.