ममुराबाद ग्रामपंचायत पोटनिवडणूक सुनील चौधरी यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 09:49 PM2019-11-26T21:49:26+5:302019-11-26T21:49:40+5:30
ममुराबाद, ता. जळगाव : ग्रामपंचायतीच्या वॉर्ड पाचमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेच्या पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी सुनील गोविंद ...
ममुराबाद, ता. जळगाव : ग्रामपंचायतीच्या वॉर्ड पाचमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेच्या पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी सुनील गोविंद चौधरी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती (कै.) गोविंद हरी चौधरी यांचे सुपूत्र आणि ममुराबादचे माजी सरपंच हेमंत चौधरी यांचे बंधू आहेत.
वॉर्ड पाचमधील अनुसुचित जमाती महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन राखीव जागांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रत्यक्षात निवडणुकीला फाटा देत दोन्ही जागा बिनविरोध निवडून आणण्याचा नवा पायंडा यावेळी पाडण्यात आला.
निवडणूक यंत्रणेनेदेखील त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वॉर्ड पाचमधील अनुसुचित जमाती महिला, हे पद नेमके सरपंचांच्या खुर्चीसाठी राखीव असताना त्या जागेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र भाग्यश्री गोपाल मोरे यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर कोणीच त्यांच्या विरोधात गेले नाही. त्यामुळे भाग्यश्री यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सोपा झाला. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठीसुद्धा माजी सरपंच अमर पाटील तसेच सुनील चौधरी, सोमा नारखेडे आणि हारुन पिंजारी यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी अन्य तिघांनी सामंजस्याने माघार घेतल्याने सुनील चौधरी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब
झाले.
दोन्ही जागांची निवड बिनविरोध झाली असली तरी अधिकृत निकाल ९ डिसेंबरलाच जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिंप्राळा भागाचे मंडल अधिकारी रवींद्र उगले, ममुराबादचे तलाठी एस. एस. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.