उद्योजकांच्या विनंतीनंतर नवीन स्मशानभूमीच्या जागेत महापालिकेने केला बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:04+5:302021-04-20T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील जागा शिल्लक नसल्याने महापालिका प्रशासनाकडून एमआयडीसी मध्ये नवीन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर व उद्योजकांनी केलेल्या आग्रहानंतर महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीचे काम थांबवून नवीन जागेवर सोमवारपासून स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी दिली आहे.
शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना मृतदेहासोबत तासन तास थांबून वाट पाहावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने एमआयडीसी भागातील जी सेक्टर मध्ये एका मोकळ्या जागेवर नवीन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र या भागात रहिवास जास्त असल्याने व काही कारखाने असल्याने स्थानिक नागरिकांनी या स्मशानभूमीच्या कामाला विरोध केला होता. तसेच काही उद्योजकांनी देखील या जागे व्यतिरिक्त इतर जागेवर नवीन स्मशानभूमीचे काम करावे अशी विनंती महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आधी सुरू केलेले काम थांबवून आता सोमवारपासून ई सेक्टर मध्ये नवीन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली आहे. दोन दिवसात हे काम पूर्ण होणार असून याठिकाणी सात ओटे तयार करण्यात येणार आहेत.
स्मशानभूमीच्या कामामुळे नाले सफाईचा मुहूर्त हुकला
महापालिका प्रशासनाने नवीन स्मशानभूमीच्या कामासाठी तिन्ही जेसीबी कामाला लावले असून, यामुळे सोमवारपासून शहरातील नाले सफाईच्या कामाला होणारी सुरुवात थांबली आहे. मान्सून पूर्वतयारीसाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील ७२ छोट्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात केली जाणार होती. मात्र स्मशानभूमीच्या कामामुळे नाल्यांच्या सफाईचा मुहूर्त हुकला आहे. स्मशानभूमीचे काम आटोपल्यानंतर शहरातील नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी दिली. दरम्यान शहरातील पाच मुख्य नाल्यांच्या साफसफाईसाठी देखील महापालिका प्रशासनाकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यासाठी पुढील आठवड्यात मनपाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून मे अखेरपर्यंत शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.