गाळेकारवाईसाठी मनपाकडून जोरदार हालचाली सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:27 PM2019-09-10T12:27:43+5:302019-09-10T12:28:25+5:30
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या भाड्यातील घसाऱ्याची रक्कम कमी करून देखील गाळेधारक थकीत रक्कम भरत नसल्याने आता ...
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या भाड्यातील घसाऱ्याची रक्कम कमी करून देखील गाळेधारक थकीत रक्कम भरत नसल्याने आता मनपाकडूनच कारवाईसाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात मनपाने पोलीस बंदोबस्त मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनपा मालकीच्या २२ मार्केटमधील २३८७ गाळेधारकांची कराराची मुदत सन २०१२ मध्येच संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील गाळे कारवाईबाबत आदेश दिले आहेत. मात्र, मनपाने लावण्यात आलेले भाड्याचे दर हे अवास्तव असल्याने गाळेधारकांकडून भाडे भरण्यास नकार दिला जात होता. गाळेधारकांच्या मागणीप्रमाणे आमदार सुरेश भोळे यांनी गाळ्यांचे पुर्नमुल्यांकनाचे आदेश देवून गाळ्यांचा घसारा रक्कम कमी करून नव्याने बीले वाटप करण्यात आली. त्यानुसार फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांकडील थकीत रक्कम तब्बल ८८ कोटी रुपयांनी कमी करण्यात आली.
दोन गाळेधारकांनी भरली १० लाखांची रक्कम
मनपा आयुक्तांनी दिलेला अल्टिमेटम संपायला तीन दिवस शिल्लक असताना सोमवारी सायंकाळी फुले मार्केटमधील दोन गाळेधारकांनी प्रत्येकी १० लाख प्रमाणे २० लाखांची रक्कमेचा धनादेश आयुक्त उदय टेकाळे याच्यांकडे सादर केला. गाळेधारकांना अजून तीन ते चार दिवस भाडे भरण्याची मूदत असून, गाळेधारकांनी रक्कम भरण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात येत आहे.
गाळेधारकांना सर्व संधी देवूनही मिळत नाही भाड्याची रक्कम
आतापर्यंत मनपा असो वा राजकीय प्रतिनिधींकडून गाळेधारकांवर अन्याय होणार नाही. म्हणून गेल्या सात वर्षांपासून कारवाई देखील होवू दिली नाही. तसेच गाळेधारकांना जास्त वाटत असलेली भाड्याची रक्कम देखील मनपाने आता कमी केली आहे. मात्र, तरीही गाळेधारक मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याने आता गाळेधारकांना मिळत असलेले राजकीय समर्थन देखील कमी होण्याची शक्यता आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आता गाळेधारकांना अनेक संधी देवूनही भाड्याची रक्कम भरायला तयार नसल्याने आता मनपा प्रशासन घेईल तोच निर्णय मान्य करावा, असे मत खासगीत व्यक्त केले जात आहे.