शहरातील १५० बेवारस वाहनांचा मनपा करणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:08+5:302021-07-17T04:14:08+5:30

उपायुक्तांची माहिती : वाहतूक विभाग व मनपाने केली होती पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर ...

Municipal Corporation will auction 150 unattended vehicles in the city | शहरातील १५० बेवारस वाहनांचा मनपा करणार लिलाव

शहरातील १५० बेवारस वाहनांचा मनपा करणार लिलाव

Next

उपायुक्तांची माहिती : वाहतूक विभाग व मनपाने केली होती पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर भागांमध्ये अनेक वर्षांपासून पडलेल्या बेवारस वाहनांचे सर्वेक्षण मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक शाखेकडून गेल्या आठवड्यात करण्यात आले होते. त्यानुसार शहरात एकूण १५० वाहने बेवारस स्वरूपात आढळून आली आहेत. ही सर्व वाहने मनपा प्रशासनाकडून लवकरच ताब्यात घेण्यात येणार असून, या सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

शहरातील मुख्य रस्त्यालगत अनेक वर्षांपासून वाहने पडून आहेत. या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्यादेखील निर्माण होत असते, तसेच या वाहनांचा वापर काही चुकीच्या कामांसाठीदेखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून गेल्या आठवड्यात शहरातील मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाअंती १५० वाहने बेवारस स्वरूपात आढळून आली आहेत. मनपाच्या टोइंग व्हॅनने ही वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच मूल्यांकन करून या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे, तसेच शहरातील इतर भागांतदेखील मनपाकडून लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे.

ट्रान्स्पोर्टनगराला लागून असलेली जागा मनपा ताब्यात घेणार

शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौक ते कालिंका माता चौकादरम्यान असलेल्या ट्रान्स्पोर्टनगराला सुरू असलेला वाहने स्क्रॅप करण्याचा व्यवसाय मनपाने बंद करण्याचा सूचना दिल्या आहेत, तसेच ही जागा दोन दिवसांत खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनाकडून या ठिकाणच्या दुकानदारांना दिले आहेत. सोमवारपर्यंत ही जागा न सोडल्यास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व जिल्हा पोलीस विभागाकडून संयुक्तिक कारवाई करून ही जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. शहरातील १४७/१ ब मधील खुल्या जागेवर अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतपणे दुकाने थाटून, याठिकाणी वाहने स्क्रॅब करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत लोकशाही दिनमध्ये मनपा प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत मनपा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेण्याचा सूचना दिल्या आहेत, तसेच याठिकाणी कारवाई झाल्यानंतर ही जागा ताब्यात घेऊन याठिकाणी कंपाउंड भिंत तयार करण्याचा सूचना मनपा आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

Web Title: Municipal Corporation will auction 150 unattended vehicles in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.