मनपा कर्मचारी व हॉकर्सची आता हातघाईची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:14 PM2020-05-29T12:14:53+5:302020-05-29T12:15:17+5:30
जळगाव : शहरातील रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्सचा प्रश्न गंभीर होत जात आहे. मनपाकडून कारवाई होत असताना हॉकर्स देखील कारवाईला जुमानता ...
जळगाव : शहरातील रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्सचा प्रश्न गंभीर होत जात आहे. मनपाकडून कारवाई होत असताना हॉकर्स देखील कारवाईला जुमानता दिसून येत नाही. बुधवारी काही हॉकर्सने मनपाच्या पथकावर दगडफेक केल्यानंतर गुरुवारी मनपाच्या पथकाने हॉकर्सची हातगाडी जप्त न करता हॉकर्ससमोरच तोडून लावली. त्यामुळे आता हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये हातघाईची लढाई सुरु झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंनग पाडून व्यवसाय करण्याचा सूचना मनपा प्रशासनाकडून भाजीपाला विक्रेत्यांना दिल्या जात आहेत. मात्र, मनपा प्रशासनाच्या या सूचनांचे पालन हॉकर्सकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून दररोज हॉकर्सवर कारवाई केली जात आहे. मात्र, दररोज कारवाई होत असतानाही हॉकर्स देखील मनपा प्रशासनाला आव्हान करत मिळेल त्या जागेवर आपला व्यवसाय थाटत आहेत. मनपाकडून हॉकर्सवर कारवाई करून माल जप्त केला जातो. यावेळी नेहमीच गोंधळ होत असतो. बुधवारी काही विक्रेत्यांनी मनपाच्या पथकावर दगडफेक केल्याने एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर गुरुवारी पोलनपेठ, जुना कापड बाजारात कारवाईसाठी मनपा पथक पोहचल्यनंतर हॉकर्सने पळ काढला. ज्या हॉकर्सचा माल पकडण्यात आला. त्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ काही काळ चालल्यानंतर मनपाने एका हॉकर्सची हातगाडी जप्त न करता चौकातच तोडून टाकली. ही कारवाई प्रतिकात्मक स्वरुपाची असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. हॉकर्सला आळा बसावा म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारीही १५ ते १६ अनधिकृत हॉकर्सचा माल मनपाने जप्त केला.