मनपा अधिकारी भाजपच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:18+5:302021-02-25T04:19:18+5:30
पक्षाच्या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांचीही उपस्थिती : प्रोटोकॉलची ऐशी की तैशी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जनतेचे प्रश्न ...
पक्षाच्या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांचीही उपस्थिती : प्रोटोकॉलची ऐशी की तैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी एकीकडे वेळ मिळत नाही, तसेच जनतेचे प्रश्न आले की, मनपा अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अनेक दिवस फिरवत असतात. मात्र, हेच अधिकारी आता सत्ताधारी भाजपच्या दावणीला बांधले गेल्याचे पाहायला मिळत आहेत. गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीच्या तयारीसाठी सत्ताधारी भाजपच्या सदस्यांचा भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गुरुवारी मनपा स्थायी समितीची सभा घेण्यात येणार आहे, तर शुक्रवारी मनपाची महासभा घेण्यात येणार आहे. या सभांच्या नियोजनासाठी पक्षाची बैठक ही दरवेळी होत असते. ही बैठक शासकीय विश्रामगृह किंवा महापौर, उपमहापौरांच्या दालनात घेतली व त्या बैठकीला अधिकाऱ्यांना बोलाविले, तर एक वेळेस धकू शकते. मात्र, पक्ष कार्यालयात जर बैठक घेतली जात असेल व या बैठकीत जर मनपाचे अधिकारी उपस्थिती देत असतील, तर अधिकाऱ्यांचा उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पक्ष कार्यालयात अधिकाऱ्यांना बोलविण्यामागे उद्देश काय?
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयातील बैठकांमध्ये उपस्थित राहणे हे शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे नियमात नाही. मात्र, या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यामागे सत्ताधाऱ्यांचा उद्देश काय, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे, तसेच अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या बैठकीत विभागप्रमुखांसह अभियंत्याची उपस्थिती
भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत नगररचना, बांधकाम, विद्युत विभागातील अधिकाऱ्यांसह काही विभागप्रमुखांनीही हजेरी लावल्याची महिती समोर आली आहे. दरम्यान, या आधी अनेक बैठका या शासकीय विश्रामगृह किंवा महापौरांच्या दालनात झाल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या बैठकांमध्ये हजेरी लावणे नियमात असू शकते. मात्र, पक्ष कार्यालयात उपस्थित राहणे हे कोणत्या नियमात आहे, याचे उत्तर आता विरोधकांकडून मागितले जात आहे.
कोट..
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयातील बैठकीत हजेरी लावली की नाही, याबाबत तपासणी केली जाईल, तसेच या आधीही अशा बैठकांसाठी तशी प्रक्रिया जर सुरू असेल, तर याबाबतही माहिती घेतली जाईल.
-सतीश कुलकर्णी, आयुक्त
महापालिकेचे अधिकारी सत्ताधाऱ्यांना गहाण ठेवले गेले आहेत. शहरातील नागरिकांसाठी या अधिकाऱ्यांकडे वेळ नसतो. मात्र, सत्ताधाऱ्यांचा बैठकीत जायला यांच्याकडे वेळ कसा मिळतो, अधिकाऱ्यांनी नियमात राहून काम केले पाहिजे. महापालिका प्रशासनाने याबाबत अधिकाऱ्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.
-सुनील महाजन, मनपा विरोधी पक्षनेते