मनपा स्थायीची आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:28+5:302021-01-13T04:37:28+5:30
जळगाव : मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ...
जळगाव : मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सभेच्या मंजुरीसाठी एकूण तीन विषय ठेवण्यात आले आहेत, त्यात तीन संविदा आहेत. दरम्यान, भूसंपादनाबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मनपाची बाजू मांडण्यासाठी ॲड. शैलेश ब्रह्मे यांची नियुक्ती करण्याबाबतचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे, यासह शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर देखील ही सभा गाजण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई
जळगाव : मनपा आरोग्य विभागाकडून शहरात प्लास्टिक विक्री करणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गणेश कॉलनी भागातील साई सागर डेअरीच्या मालकाला ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे, तर मुजाहिद बागवान व राजेश शर्मा यांनाही प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
प्रभाग समिती २ च्या समस्यांचा उपमहापौरांनी घेतला आढावा
जळगाव : शहराचे उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग समिती २ मध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३, ४, १५, १६ व १७ यामधील समस्यांचा आढावा सोमवारी घेतला. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक मनोज अहुजा, चेतन सनकत, रेश्मा काळे, प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते. अमृत योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यावरील चाऱ्यांची दुरुस्ती करण्याबाबत नगरसेवकांनी उपमहापौरांकडे मागणी केली. उपमहापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भोकर येथील हंगामी पुलाचे काम पूर्ण होईना
जळगाव : जळगाव व चोपडा तालुक्याला जोडणाऱ्या भोकर येथील तापी नदीवर दरवर्षी १ जानेवारीपासून सुरू होणारा हंगामी पूल अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही. यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नागरिकांना एकतर नदीपात्रातून आपला मार्ग काढावा लागत आहे किंवा २० किमीचा फेरा घालून चोपड्याला जावे लागत आहे. मक्तेदाराकडून हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.