मनपा शिक्षकांना मिळणार चार महिन्यांचे थकीत वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:42+5:302021-06-23T04:12:42+5:30
जळगाव : कोरोनामुळे अनेक बेरोजगार झाले, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात मनपा शिक्षण मंडळात कार्यरत असलेल्या १५२ ...
जळगाव : कोरोनामुळे अनेक बेरोजगार झाले, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात मनपा शिक्षण मंडळात कार्यरत असलेल्या १५२ शिक्षकांचे, तर ४६५ सेवानिवृत्त शिक्षकांचे गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेकडून देण्यात येणारे पन्नास टक्के वेतन थकले होते. अखेर चार महिन्यांच्या थकीत वेतनाची अडीच कोटी रुपयांची रक्कम मनपाकडून शिक्षण मंडळाला अदा करण्यात आली असून बुधवारी शिक्षक व सेवानिवृत्तांच्या खात्यात वेतन जमा होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत १५२ शिक्षक, तर ४६५ सेवानिवृत्त कार्यरत आहेत. या शिक्षक व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी शासन पन्नास टक्के अनुदान देते, तर पन्नास टक्के निधी हा महानगरपालिका शिक्षण मंडळाला देत असते. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून मनपाने पन्नास टक्के वेतन थकविले होते. याबाबत नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मनपा आयुक्तांची भेट घेऊन शिक्षकांची व्यथा मांडण्यात आली होती. अखेर मनपाकडून जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांची थकीत वेतनाची रक्कम मनपा शिक्षण मंडळाला अदा करण्यात आली आहे. वेतनापोटीची अडीच कोटी रुपयांची रक्कम शिक्षण मंडळाला वर्ग करण्यात आली असून बुधवारी शिक्षकांच्या बँक खात्यावर चार महिन्यांचे थकीत वेतन जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती संघटनेचे व्ही.झेड. पाटील, गंगाराम फेगडे, किशोर रोटे यांनी दिली आहे. दरम्यान, उर्वरित दोन महिन्यांचे वेतनही तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे.