पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:07 PM2020-07-23T23:07:31+5:302020-07-23T23:07:40+5:30
कलम वाढवले; पत्नीला जिवंत जाळल्याची तक्रार
जळगाव : आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात पती पोलीस कर्मचारी पती नरेंद्र सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी पहाटे २.३० वाजता सोनाली जळालीचा निरोप नातेवाईकांना देण्यात आला होता. लगेच सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाला होता. सोनाली हिने बाथरुममध्ये जाळून घेतल्याने सासरच्या लोकांचे म्हणणे होते. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सोनालीचा पती पोलीस असल्याने त्याने सर्व पुरावे नष्ट केले असून तिला जाळून मारण्यात आल्याचा आरोप भाऊ गोविंदा चांभार यांनी केला होता. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने देखील गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन याकडे लक्ष वेधले होते. दिवसभर चौकशी करुन दोन साक्षीदारांच्या जबाबावरुन पती नरेंद्रसह सहा जणांविरुद्ध खून व हुंडाबळीचे (कलम ३०२ व ३०४ ब) कलम वाढविण्यात आले. याप्रकरणात अद्याप एकालाही अटक झालेली नाही. दरम्यान, या गुन्ह्याचा तपासही पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.