भांडण सोडायला आलेल्या हॉटेल मालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:43 AM2020-06-13T11:43:54+5:302020-06-13T11:44:06+5:30

नेरी नाका स्मशानभूमीजवळील घटना : दोन तरुण जखमी, दोन तासातच संशयित शरण

Murder of a hotel owner who came to leave the quarrel | भांडण सोडायला आलेल्या हॉटेल मालकाचा खून

भांडण सोडायला आलेल्या हॉटेल मालकाचा खून

googlenewsNext

जळगाव : हॉटेलमधील ग्राहकांशी होत असलेला वाद सोडवायला गेलेले हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (४५, रा.असोदा) यांचा बियरच्या बाटलीने गळा चिरुन खून करण्यात आला. तर दीपक दिलीप जगताप (३०, रा.अयोध्या नगर) व पंकज सुनील वडनेरे (३०, रा.मयुर कॉलनी) हे दोघं जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता नेरी नाका स्मशानभूमीला लागून असलेल्या असोदा मटन हॉटेलमध्ये घडली. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर प्रशांत भिवराज कोळी (रा.तानाजी मालुसरे नगर) व महेंद्र अशोक चौधरी (महाजन ) हे दोन तासांनी पोलिसांना शरण आले. प्रशांत कोळी व महेंद्र चौधरी हे दोघे उमेश बियर अ‍ॅण्ड वाईन शॉपवर बाजूला बसून बियर घेत होते. प्रशांत याने बियर मागितली असता कर्मचाऱ्याने दुकान बंद होण्याची वेळ झाल्याचे सांगून नकार दिला. दोघांनी वाद घातला. दीपक जगताप व पंकज सुनील वडनेरे दोघं बघत असताना प्रशांत कोळी याने ‘तु माझ्याकडे काय पाहतो रे’ असे म्हणत पंकज व दीपक यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यावेळेत बियर शॉपचे मालक उमाकांत कोल्हे यांनी दुकान बंद करुन पळ काढला.

बाटली फोडली अन् मालकाच्या गळ्यावर केले वार
प्रशांत कोळी याने जेवायला बसलेल्या पंकज व दीपक यांच्याजवळ बियरच्या बाटल्या फोडल्या. एकाच्या मानेवर तर दुसºयाच्या पोटावर मारले. नेमका काय वाद होत आहे हे पाहण्यासाठी मालक प्रदीप चिरमाडे हॉटेलमधून बाहेर धावत आले असता प्रशांत याने त्यांच्या गळ्यावरच फुटलेल्या बियरच्या बाटलीने सपासप वार केले. चिरमाडे यांना तातडीने खासगी दवाखान्यात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.याप्रकरणी शनी पेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------
लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी करायला गेले अन् डोळ्यासमोर खून होताना पाहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लग्नाचा वाढदिवस असल्याने मित्रासोबत जेवायला आलेला पंकज सुनील वडनेरे व दीपक दिलीप जगताप या दोघांवर प्रशांत भिवराज कोळी याने बियरची बाटली फोडून हल्ला केला तर हे भांडण सोडायला आलेले हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे यांचा बियरच्या बाटलीने गळा चिरुन खून झाला. या घटनेत स्वत:ला वाचविण्यासाठी चिरमाडे हॉटेलमध्ये धावत असताना त्यांच्या गळ्यातून रक्ताची चिरकांडी बाहेर उडत होती, हे दृष्य बघून मालकाच्या बचावासाठी आलेल्या चपाती कारागिर आशाबाई प्रकाश कोळी (रा.जैनाबाद) यांच्यावरही हल्ला करण्यासाठी प्रशांत याने बियरची बाटली फोडली, मात्र ती मालकाच्या मागे धावल्याने तिचा जीव वाचला..अन्यथा यात आपलाही जीव केला असता अशी आपबिती आशाबाई यांनी ‘लोकमत’ जवळ कथन केली.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या आशाबाई मालकावर झालेल्या या हल्ल्याने खूप भेदरलेल्या होत्या. अशाही परिस्थितीत त्यांना बोलते केले असता, प्रशांत व त्याचा साथीदार महेंद्र हे दोघं हॉटेलमध्ये नेहमीच जेवणाला यायचे. शुक्रवारी समोरच असलेल्या बियरशॉपीवर या दोघांचा मालकाशी वाद सुरु होता. त्यावेळी हॉटेलच्या आवारात जेवण करीत असलेले पंकज व दीपक यांनी त्यांच्याकडे पाहिले, आमच्याकडे काय पाहतो म्हणून प्रशांतने दोघांकडे धाव घेत टेबलवर बियरची बाटली फोडली. त्यावर पंकज याने प्रशांत याला जाब विचारताच त्याने पंकज व दीपक यांच्यावर हल्ला केला तर शेजारीच असलेले विनोद वाणी व चेतन नेवे यांच्याशीही त्यांनी दादागिरी केली. हा प्रकार पाहून हॉटेलच्या बाहेर आलेले मालक प्रदीप चिरमाडे यांच्यावर प्रशांत याने फोडलेल्या बाटलीनेच गळा चिरला. बचावासाठी ते हॉटेलमध्ये धावत सुटले, यावेळी त्यांच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. हॉटेलमधील चपाती कारागिरी असलेल्या आशाबाई यांनी प्रदीप यांच्याकडे धाव घेतली असता प्रशांत याने दुसरी बाटली फोडून त्यांच्यावर उगारली, तितक्यात वेटर आधार रामदास माळी यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. यावेळी पळापळ झाल्याने प्रशांत महेंद्र हॉटेलच्या बाहेर गेले व एका दुचाकीवर बसून अजिंठा चौकाच्या दिशेने निघून गेले.

दोघंही संशयित शरण
घटना घडल्यानंतर प्रशांत याने नीलेश राठोड नावाच्या तरुणाला फोन करुन घ्यायला बोलावून घेतले. नीलेश हा दोघांना घेऊन गेला व अजिंठा चौकात उतरुन पसार झाले. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी व फरार होण्याचे मार्ग बंद केल्याने प्रशांत हा शनी पेठ पोलिसांना शरण आला, त्यानंतर तासाभराने महेंद्र महाजन देखील पोलिसांना शरण आला. तर हेमंत उर्फ चिन्या संजय खैरनार यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चिन्या हा दोघांच्या सोबत दुचाकीने आल्याचे तपासात समोर आले आहे. राठोड याचा शोध सुरू होता. दोघंही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून याआधी देखील त्यांनी मेहरुणमधील सुनीता वंजारी या महिलेच्या घरात घुसून बियरच्या बाटल्या फोडून हल्ला केला होता.

पंकज पोलीस पाल्य, दीपक होमगार्ड
या घटनेत जखमी झालेला पंकज हा पोलीस दलातील हवालदार सुनील वडनेरे यांचा मुलगा आहे तर दीपक हा होमगार्ड आहे. दोघंही मित्र आहेत. पंकजच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने दोघं मटणाचे जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेले होते. त्यांच्यासोबत आधीच विनोद वाणी व चेतन नेवे हे देखील तेथे जेवणाला आले होते. चेतन व विनोद यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, शनी पेठचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटना बघणाºया महिला व हॉटेल कारागिरी तसेच बियर शॉपच्या मालकाकडून माहिती जाणून घेतली. बियर शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने घटना कैद होऊ शकली नाही.

लॉकडाऊनमध्ये हॉटेल सुरु ठेवणे बेतले जीवावर
लॉकडाऊन असल्याने हॉटेल सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. असे असतानाही प्रदीप चिरमाडे यांनी मुख्य दरवाजा बंद ठेवून मागील दरवाजाने हॉटेल सुरु ठेवले होते,तेच चिरमाडे यांच्या जीवावर बेतले. हॉटेल सुरु केली नसती तर त्यांचा जीव वाचला असता. दरम्यान, बियर व वाईन शॉपला सीलबंद बाटलीतूनच मद्य विक्रीस परवानगी दिलेली आहे, असे असताना तेथे संशयितांनी मद्यप्राशन कसे केले? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ याच वेळेत दुकान व परमीट रुममधून मद्य विक्रीस परवानगी आहे. बसून मद्य प्राशन करण्यास परवानगी नाही.

Web Title: Murder of a hotel owner who came to leave the quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.