किरकोळ कारणावरून विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:32 PM2021-03-30T23:32:54+5:302021-03-30T23:33:30+5:30
किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची हृदयद्रावक घटना शेवरे बुद्रूक, ता. चोपडा येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अडावद, ता. चोपडा : घरगुती किरकोळ कारणावरून ३८ वर्षीय पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची हृदयद्रावक घटना शेवरे बुद्रूक, ता. चोपडा येथे घडली. दि. २८ रोजी रात्री १० वाजेनंतर घडलेली ही घटना २९ रोजी पहाटे ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी पती नारायण भिलाला यास अडावद पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेवरे बुद्रूक येथील नारायण केऱ्या भिलाला (४०) व त्याची पत्नी गणूबाई नारायण भिलाला (३८) यांच्यात नारायण याच्या दारूच्या व्यसनावरून नेहमी पत्नीशी भांडण होत होते. दि.२८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोघांत भांडण झाले. यावेळी गणूबाई हिच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घातल्याने तिच्या डोके, कान, नाकातून रक्त वाहत असल्याचे नारायणचा मुलगा नीलेश याच्या दि. २९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. नारायण यानेच गणूबाईच्या डोक्यात कुऱ्हाड मारली असल्याचे नीलेशजवळ कबूल केले. त्याने ही घटना नातेवाईक व गाव पाटील यांना सांगितली.
जखमी विवाहितेस चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणल्यावर पुढील उपचारार्थ गोदावरी हाॅस्पिटल येथे घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी ती मयत असल्याचे सांगितले. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात नारायण भिलाला विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली आहे. तपास उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण दांडगे हे करीत आहे.