प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा डोक्यात दगड टाकून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 23:28 IST2024-06-19T23:27:50+5:302024-06-19T23:28:01+5:30
पत्नीसह दिराला अटक, कोदगाव शिवारातील घटनेचे रहस्य उलगडले

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा डोक्यात दगड टाकून खून
संजय सोनार
चाळीसगाव (जि. जळगाव) : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीवर ब्लेडने वार करून तसेच डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे. ही थरारक घटना तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे पतीच्या अपघाती मृत्यूचा बनाव तिने केला.
बाळू सीताराम पवार (३५, रा.गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे या मृत इसमाचे नाव आहे. तो पत्नी वंदना पवार (३०) हिच्यासह न्यायडोंगरी येथे राहत होता. तिचे व चुलत दीर गजानन राजेंद्र पवार (३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
वंदना व बाळू हे मंगळवार १८ रोजी न्यायडोंगरी येथून चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारू पाजली. सायंकाळी गजानन यास दुचाकीने कोदगाव ता. चाळीसगाव शिवारात नेले. तिथे वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले आणि मृतदेह महामार्गावर टाकून दिला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले.
दरम्यान, तुषार अनिल देसले (रा. कोदगाव, ता. चाळीसगाव) यांनी १८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसात अपघाताची माहिती दिली. त्यावरून चाळीसगाव शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी आधारकार्डावरुन माहिती घेत वंदना व गजानन यास बुधवारी सायंकाळी अटक केली.