कोरोनामुक्तीसाठी केली मुस्लीम बांधवांनी प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:58+5:302021-05-15T04:15:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करीत हा सण उत्साहात साजरा केला. दरवर्षी प्रमाणे यंदाही ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. मात्र यावेळी काही मोजकेच जण उपस्थित होते. त्यावेळी कोरोना दूर व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
दरवर्षी मुस्लिम बांधव ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करतात. मात्र यंदा मोजक्या जणांच्या उपस्थितीत ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग शिकारे हे ईदगाह मैदानावर उपस्थित होते
त्यावेळी ईदगाह ट्रस्टतर्फे गफ्फार मलिक, अशफाक बागवान, ताहेर शेख, अनिस शाह, जाफर शेख, ॲड. आमिर शेख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्यांचा दफनविधी चोखपणे पार पाडणाऱ्या ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह यांचे यावेळी मान्यवरांनीही कौतुक केले. प्रास्ताविक मुफ्ती हारुन यांनी तर सूत्रसंचलन फारुक शेख यांनी केले.
गेल्या वर्षी देखील ईदनिमित्त नागरिक बाहेर फिरताना दिसून आले नाही. सर्वांनी ईदची नमाज घरीच अदा केली. त्यानंतर एकमेकांना फोन, व्हिडियो कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या.
ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत बाजारात गर्दी होती. ईद निमित्त मिठाई, सुकामेवा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. त्यासोबतच घरोघरी विविध पक्वान्न बनवण्यात आले होते. ईद निमित्त दुध आणि सुकामेवा यांचा वापर करून मुस्लिम बांधवांच्या घरी शिरखुर्मा बनवला जातो. नमाज पठणानंतर शिरखुर्मा खाऊन मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यंदा एकमेकांच्या घरी जाता आले नसले तरी सर्वांनी घरीच शिरखुर्म्याचा आनंद लुटला.