कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी केली ईदच्या दिवशी दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 07:53 PM2020-05-25T19:53:02+5:302020-05-25T19:55:02+5:30
कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी ईद-उल-फित्रला घराघरात दुवा करण्यात आली.
भुसावळ : शहर व परिसरामध्ये यंदा अत्यंत साध्या पद्धतीने घरातच ईद साजरी करण्यात आली. कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी ईद-उल-फित्रला घराघरात दुवा करण्यात आली. तसेच यंदा ईदमध्ये गळाभेट, हस्तांदोलन टाळून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर मोठे संकट आले आहे. या स्थितीत देशाची आर्थिक स्थिती डबघाईला जात आहे. सर्वसामान्यांची उपजीविका चालवणे अवघड बनले आहे. याकरिता मुस्लिम समाज बांधवांनी नवीन कपडे त्यागून गोरगरिबांची जास्तीत जास्त मदत करण्याकडे भर दिला. यंदा ईदची सामूहिक नमाज पठण न झाल्यामुळे साहजिकच गळाभेट वस्तू हस्तांदोलनही समाज बांधवांनी टाळले.
हालत हमे इजाजत नही देती हम खुशिया मनाये
देशावर मोठे कोरोनाचे संकट आले असताना हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असताना तसेच महामारीच्या या काळात अनेक बांधव महामारीचा सामना करत असताना 'हालत हमे इजाजत नही देते की, हम ईदकी खुशियाँ मनायें’, असे भावनिक वाक्य अनेक ठिकाणी ऐकण्यास मिळाले.
'ईद' हा आनंद साजरा करण्याचा पर्व असतो. मात्र यंदा ईद अत्यंत साध्या पद्धतीने घरातच राहून साजरी करण्यात आली. जुन्या जाणत्यांंच्या मते आयुष्यात कधीही ईदची नमाज घरी पठण केली नाही. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. सन २०२० च्या ईदची इतिहासात नक्कीच नोंद होईल, येणाºया ईदमध्ये आजच्या ईदच्या आठवणींना उजाळा मिळेल.
हिंदू बांधवांनी सोशल मीडियावर दिले मुस्लीम बांधवांना शुभेच्छा.
घडविले जातीय सलोख्याचे दर्शन
ईद नमाज पठण झाल्यानंतर हिंदू समाज बांधव मुस्लीम समाज बांधवांच्या घरी येऊन ईदच्या शुभेच्छा देतात व मुस्लीम बांधवही त्यांना शिरखुर्माचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ देत नाही. नेहमीच ईदला जातीय सलोखा दिसून येतो. यंदा परिस्थिती वेगळी असल्यामुळे हिंदू समाज बांधवांनी सोशल मीडिया, भ्रमणध्वनीद्वारे मुस्लीम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
बच्चा कंपनीचा हिरमोड, यंदा नाही मिळाली ‘ईद्दी’
यंदा ईदला बच्चे कंपनीचा चांगला हिरमोड झाला. ईदला भेटण्यासाठी येणारे प्रत्येक आप्तेष्ट बच्चे कंपनीला ईद्दी (भेट) देतात. यंदा मात्र घरच्या घरीच ईद साजरी झाल्यामुळे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. फक्त फोनवर शुभेच्छा देण्यात आल्या. यामुळे बच्चे कंपनींना ईद्दी मिळाली नसल्याने बच्चे कंपनीचा चांगला हिरमोड झाला.