‘त्या’ शाळेत माझा पाल्य शिक्षण घेत आहे,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:38+5:302021-06-09T04:19:38+5:30
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले पत्र लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अतिरिक्त कामाचा बोज व शानभाग शाळेत पाल्य शिक्षण घेत आहे. ...
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अतिरिक्त कामाचा बोज व शानभाग शाळेत पाल्य शिक्षण घेत आहे. त्यामुळे ‘त्या’ शाळेच्या शालेय पोषण आहार योजनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीतून नाव वगळण्यात यावे, असा विनंती अर्ज पाचोरा गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सोमवारी शिक्षणाधिकारी यांना पाठविला आहे.
शालेय पोषण आहार योजना सुरू झाल्यापासून शानभाग विद्यालयाने या योजनेचा लाभ घेतला आहे. पुरवठादाराकडून पुरविण्यात आलेले धान्यादी मालसुध्दा स्वीकारला आहे. पण, गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिजवून अन्न दिलेले नाही. या आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहे. एवढेच नव्हे तर शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड सुध्दा बनावट असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता रवींद्र शिंदे यांनी पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शालेय पोषण आहार उपसंचालक यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी शिक्षणाधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी विकास एम. पाटील (पंचायत समिती, पाचोरा), शापोआ लेखा अधिकारी शामकांत एच. नाहळदे (प्राथमिक शिक्षण विभाग) तसेच शापोआ अधिक्षक अजित तडवी (पंचायत समिती, रावेर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, पाचोरा गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी चौकशी समितीतून नाव वगळण्यात यावे, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी पाचोरा गटात ४ पैकी २ विस्तार अधिकारी, १४ पैकी १२ केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत. सर्व अतिरिक्त कामांचा बोजा व शानभाग शाळेत पाल्य शिक्षण घेत आहे. त्यामुळे चौकशी समितीतून नाव वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे.