माझा बाप अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 04:18 PM2019-07-31T16:18:27+5:302019-07-31T16:19:23+5:30
‘मुलं अभ्यास करीत नाही,’ अशी सर्वसामान्य पालकांची ओरड असते. मात्र जामनेरातील एका मुलाने ‘माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी चक्क पोलीस स्टेशनमध्ये येऊन केल्याने एकाच खळबळ उडाली.
मोहन सारस्वत/लियाकत सैयद
जामनेर, जि.जळगाव : ‘मुलं अभ्यास करीत नाही,’ अशी सर्वसामान्य पालकांची ओरड असते. मात्र जामनेरातील एका मुलाने ‘माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी चक्क पोलीस स्टेशनमध्ये येऊन केल्याने एकाच खळबळ उडाली. संवेदनशील मनाचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी त्याची विचारपूस करून त्याला नवीन कपडे दिले व पालकांना बोलावून समजूत घातली.
शहरातील भुसावळ रोड भागात राहत असलेल्या कुटुंबातील हा १२ वर्षांचा मुलगा. आई शेतात मजुरी करते व वडील मिस्त्री काम करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. दोन्ही मुले शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पाऊस सुरू असताना हा मुलगा हाफ चड्डी व बनियानवर ओला झालेल्या स्थितीत पोलीस ठाण्यात आला व बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागला.
निरीक्षक इंगळे, पोलीस कर्मचारी नीलेश घुगे यांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. दुकानात नेले. तेथून कपडे घेऊन दिले, तो म्हणाला, सँडलसुद्धा पाहिजे. मग काय साहेबानी सॅण्डलही घेऊन दिली. अभ्यास करण्याची इच्छा आहे मात्र बाप टीव्ही पाहतो, अभ्यास करू देत नाही, मारतो. हे ऐकून इंगळे यांनी त्याच्या आई, वडिलांना बोलाविले व समजूत घातली.
या घटनेने त्या मुलाची शिक्षणाबद्दलची असलेली तळमळ दिसून आली आणि पोलिसातील माणुसकीचेही दर्शन घडले.