"त्यांच्यापासून माझ्या कुटूंबाला धोका आहे..," सुसाईड नोट लिहून तरूणाची आत्महत्या
By सागर दुबे | Published: April 26, 2023 07:47 PM2023-04-26T19:47:03+5:302023-04-26T19:47:57+5:30
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : माझ्या आत्महत्येला सर्वस्व चार लोक जबाबदार आहे. मला वारंवार मानसिक त्रास देवून मला जीवे मारण्याची धमकी देत असतात. त्यांच्यापासून माझ्या कुटूंबाच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. यात माझ्या कुटूंबाचा काहीही संबंध नसून तरी मला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे, अशी सुसाईड नोट लिहून उमेश एकनाथ ठाकूर (३७) या तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १ वाजता रामेश्वर कॉलनीमध्ये उघडकीला आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ उमेश ठाकूर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो एका कंपनीत कामाला होता. बुधवारी दुपारी ठाकुर यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मनहेलवणारा आक्रोश केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांच्याघराकडे धाव घेतली आणि उमेश यांचा मृतदेह खाली उतरवून त्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात वाहनातून हलविले.
याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपाासणीअंती उमेश यांना मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांसह मित्र मंडळींची रूग्णालयात एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी देखील रूग्णालयात येवून पंचनामा केल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मृतदेहाची अंगझडती घेतल्यावर पोलिसांना पँटच्या खिश्यामध्ये सुसाईड नोट मिळून आली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. प्राथमिक तपास अल्ताफ पठाण करीत आहे.