२८ एप्रिलपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:08+5:302021-04-25T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राबविण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आता पुन्हा जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राबविण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आता पुन्हा जिल्ह्यात २८ एप्रिल ते २ मे या दरम्यान राबविण्यात येणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व यंत्रणांना पत्र देऊन घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची व माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावी ठरल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानुसार आता ही मोहीम पुन्हा राबविण्यात यावी याविषयी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील ही मोहीम जिल्ह्यात राबविण्याविषयी आदेश काढून २८ एप्रिल ते २ मे या दरम्यान मोहीम राबविण्याचे यंत्रांना कळविले आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व प्रांताधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले आहे.
या मोहिमेदरम्यान दररोज झालेल्या सर्वेक्षणाची माहिती संकलित करण्याची जबाबदारी तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे लवकर निदान लवकर उपचार होऊन संसर्ग रोखता येऊ शकतो, यासाठी सर्व यंत्रणांनी उपाययोजना कराव्या असे आदेशात म्हटले आहे.