म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही, जिल्ह्यात ३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:21+5:302021-05-29T04:13:21+5:30
डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडनंतर म्युकरमायकोसिस या आजाराचे आव्हान येऊन ठेपले असून, याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ...
डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडनंतर म्युकरमायकोसिस या आजाराचे आव्हान येऊन ठेपले असून, याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणेनेही कोविडनंतर आता या आजारावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. प्रतिकारक्षमतेवर अवलंबून असलेला हा आजार संसर्गजन्य नाही किंवा कोविडची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला तो होतोच असेही नाही, त्याची वेगवेगळी कारणे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यासाठी वैयक्तिक स्वच्छता, नियमित स्वच्छ धुतलेला मास्क अशा काही गोष्टी पाळल्यास आपण या आजाराला दूर ठेवू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
म्युकरमायकोसिस हा बुरशीचा प्रकार आहे. बुरशीमध्ये अनेक प्रकार असतात, त्याच्यापैकी चुकून यास बुरशी असे नाव पडले. काळी बुरशी हा वेगळा प्रकार आहे. म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीत येत नाही. कोविडआधीही हा आजार अनेक रुग्णांमध्ये आढळलेला आहे. या आजाराला संधीसाधू आजार म्हणतात. त्यात एचआयव्हीबाधितांच्या फुप्फुसांवर म्युकरमायकोसिस परिणाम करतो. सामान्य प्रतिकारक्षमता असलेल्यांना म्युकरमायकोसिस होत नाही. ही बुरशी डोळा व नाकाच्या पोकळीमध्ये जाऊन बसते, ज्यांना मधुमेह आहे, एचआयव्ही आहे, टीबीतून बरे होणारे रुग्ण, अवयवप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेले किंवा नुकत्याच कोणत्यातरी विषाणूजन्य आजारातून बरे झालेल्यांना याचा धोका अधिक आहे, अशी माहिती सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी दिली.
जिल्ह्यात रुग्ण ३०
मृत्यू ६,
शासकीय नोंदीपेक्षा खासगी यंत्रणेत अधिक रुग्ण असून मृत्यूही अधिक असल्याची माहिती आहे.
या आजाराचे खासगीत अगदीच महागडे उपचार असल्याने आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत या आजारावर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता सीटू हा नॉन कोविड म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी तर कक्ष क्रमांक ७ मध्ये कोविडबाधित व ज्यांना म्युकरमायकोसिसचा त्रास आहे, अशा रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातही या आजारावर जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जातात. गेल्या दोन महिन्यांत जिल्हाभरात या आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासकीय नोंदीनुसार सद्य:स्थितीत ३० रुग्ण जीएमसी व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
प्राथमिक लक्षणे
डोळ्यांच्या दोन्ही बाजूला बधिरपणा येतो, आजूबाजूला सूज यायला लागते, डोके दुखते, नाकातून रक्त येऊ शकते, तांबड्या रंगाची घाण नाकातून निघू शकते, ताप येतो, डोळे दुखतात.
कोट
बुरशी ही मुळात नाकात असते, पण ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी असते त्यांच्या शरीरात तिची वाढ होते. आधी या आजाराचे अगदीच नगण्य प्रमाण होते. वर्षभरातून एखादी शस्त्रक्रिया होत होती. मात्र, आता ते प्रमाण वाढले आहे. आपण सध्या जे मास्क वापरतो ते नियमित धुऊनच वापरावेत. वैयक्तिक स्वच्छता व प्रतिकारक्षमता महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे त्याकडे लक्ष असू द्यावे.
- डॉ. नितीन विसपुते, कान, नाक, घसा तज्ज्ञ
म्युकरमायकोसिस शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. सद्य:स्थितीत तो श्वासावाटे पसरत आहे. मात्र, तो संसर्गजन्य आजार नाही, कुटुंबात एका व्यक्तीला झालेला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही; किंवा प्रत्येक कोविड झालेल्या रुग्णाला तो होईलच असेही नाही. व्यवस्थित आहार, स्वच्छता या गोष्टी पाळणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. धमेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ
महत्त्वाचे
मातीमध्ये, वातावरणात ही बुरशी आढळते. ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे अशांमध्ये ती अधिक वाढत जाते. हा संसर्गजन्य आजार नाही. ज्यांची प्रतिकारक्षमता सामान्य आहे त्यांना याची लागण होत नाही. यासाठी हात स्वच्छ धुणे, वारंवार नाकाला हात लावणे टाळणे, मास्क परिधान करणे व तेही स्वच्छ धुऊनच परिधान करणे, प्रतिकारक्षमता चांगली ठेवणे.
- डॉ. किशोर इंगोले, विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, जीएमसी
ही काळजी घ्या
स्वच्छता ठेवणे, मास्क, हातरुमाल धुतलेलाच वापरणे, हात स्वच्छ धुणे, प्रतिकारक्षमतेसाठी मोड आलेले धान्य, अंडी, प्रोटीनयुक्त आहार घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कोविडच्या उपचारानंतर दर १५ दिवसांनी रक्तातील साखरेचे प्रमाण मोजावे. साखर वाढली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.