नागपंचमीला येथे होते नागवेलीची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:28 PM2017-07-27T16:28:50+5:302017-07-27T16:36:44+5:30
शिरसोली बारी पंच मंडळाची शेकडो वर्षाची परंपरा
ऑनलाईन लोकमत जळगाव, दि.27 - सर्प अर्थात नागराजाबाबत मानवी मनात भय आणि भीती असताना शेतक:याचा मित्र म्हणून भारतीय संस्कृतीत नागपंचमी साजरी केली जाते. मात्र तालुक्यातील शिरसोली येथे सूर्यवंशी बारी समाजबांधवांकडून आपला पिढीजात व्यवसाय असलेल्या नागवेल देवतेची या दिवशी पूजा केली जात असते. समुद्रमंथनात नवरत्नांसोबत नागवेलीचा वेल बाहेर आल्याची अख्यायिका आहे. त्यावेळी नागवेलीच्या उपासनेची जबाबदारी बारी समाजाने घेतली होती. तेव्हापासून नागवेलीची वर्षानुवर्षे बारी समाजबांधवांकडून उपासना केली जात आहे. नागवेलीचा पारंपारिक व्यवसाय जळगाव जिल्ह्यात शिरसोली, पिंप्राळा, जुने जळगाव, हरि विठ्ठल नगर, पहूर, शेंदुर्णी, अमळनेर, चोपडा, पारोळा, यावल, रावेर या भागात बारी समाजबांधवांकडून पारंपारिक व्यवसाय असलेल्या नागवेलीची शेती करण्यात येत असते. लागवड केल्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे या पानतांडय़ाची देखभाल करण्यात येत असते. ही शेती करीत असताना बारी बांधवांकडून मोठय़ा प्रमाणात पावित्र्य जपले जात असते. नागवेलीचे उपासक म्हणून नागपंचमी उत्सव जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे अनेकांकडून पानशेती केली जाते. नागवेलीचे उपासक म्हणून नागपंचमीच्या दिवशी शिरसोली प्र.न.येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळातर्फे नागवेलीचे पूजन केले जाते. गावात शोभायात्रा काढून सर्व समाजबांधव गावाच्या जवळील नागवेलीच्या शेतात दाखल होतात. शोभायात्रेत कलशधारी महिला, वह्यांचे वाचन करणारे गायक तसेच सुवासिनी यांचा समावेश असतो. नागवेलीच्या शेतात दाम्पत्यातर्फे विधीवत पुजा केले जाते. यावेळी विश्वशांती आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करीत नागदेवतेचा प्रकोप होवू नये यासाठी प्रार्थना केली जाते. यावेळी पानतांडय़ात नागदेवतेच्या गौरवाची गाथा सांगणारे वही गायन करण्यात येत असते. चुलीवर तवा आणि विळ्याचा वापर नाही नागपंचमीच्या दिवशी शेतात कोळपणी, ओखरणी किंवा शेतीच्या मशागतीचे कामे केली जात नाहीत. तसेच स्वयंपाकाच्या वेळी चुलीवर तवा ठेवला जात नाही. तसेच भाजी चिरण्यासाठी विळा अथवा धारदार साहित्याचा वापर टाळला जातो. स्वयंपाकात या दिवशी बाजरीचे दिवे असा मेनू असतो. पूर्वी त्यासाठी बारी पंच मंडळातर्फे प्रत्येक घरात गुळाचे वाटप केले जात होते. नागवेल पूजनासह गुणवंत विद्याथ्र्याचा सत्कार शिरसोली येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळातर्फे नागपंचमीनिमित्त गुरुवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. कार्याध्यक्ष शरद नागपुरे यांच्या हस्ते सपत्नीक नागवेलीची पूजा करण्यात आली. त्यानंतर बारी भवन येथे समाजातील गुणवंत विद्याथ्र्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या धनुबाई आंबटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजेंद्र पायघन, शिरसोलीचे सरपंच अजरुन काटोले, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष रंगराव बारी, ग्रा.पं.सदस्य गोपाल अस्वार, रामकृष्ण काटोले, सदाशिव ताडे, संतोष आंबटकर, माजी अध्यक्ष अशोक अस्वार, हरिचंद्र काळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी समाजातील 70 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मनोज अस्वार यांनी तर आभार सचिव भगवान बुंधे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सूर्यवंशी बारी पंच मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.