ना.बा.लेले : तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:28 AM2020-03-01T00:28:28+5:302020-03-01T00:28:43+5:30

ज्येष्ठ पत्रकार ना.बा. तथा बापूराव लेले यांची यंदा जन्मशताब्दी. यानिमित्त ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत त्यांची पुतणी संयोगिता गोगटे...

NABLE: A principled, charismatic personality | ना.बा.लेले : तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी व्यक्तिमत्त्व

ना.बा.लेले : तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी व्यक्तिमत्त्व

Next

‘६२, काकानगर, ना.बा. तथा बापूराव लेले’ हा पत्ता आहे एका अशा व्यक्तीचा, की जी दिल्लीकरच नाहीत तर सर्व संघ परिवाराला, जुन्या पिढीला माहिती नाही असे संभवतच नाही. इथे वास्तव्याला असत कै.ना.बा. तथा बापूराव लेले, भाषिक वृत्तसंस्थेचे दिल्ली कार्यालयाचे प्रमुख आणि मराठी दैनिकाचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी या जबाबदाऱ्या सांभाळणारे एक वडीलधारे पत्रकार. पत्रकारिता हे क्षेत्र किंवा ही जबाबदारी बापूराव यांच्याकडे खूप नंतर आलेली आहे. मूळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. दहावीपर्यंत जळगावात शिक्षण झालेल्या बापूरावांची यंदा जन्मशताब्दी. यानिमित्त त्यांच्या पुतणीने केलेले स्मरण.
जवळजवळ अर्धशतक दिल्लीत वास्तव्य असल्याने महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्तींचे ना.बा. तथा बापूराव लेले हे दिल्लीतील मार्गदर्शक असत. त्यांच्या स्वभावाचे पैलू सांगायचे झाले तर तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी, निर्भय, लढाऊ, निष्कलंक चारित्र्य, आणि कुशाग्र बुद्धी अविचल देशभक्ती आणि अखंड कार्यमग्न.
बापूराव उंच नि मध्यम, आडव्या बांध्याचे, रंग गोरा, डोळे घारे, स्वच्छ पांढरा पायजमा झब्बा आणि त्यावर चार खिसे असलेले जाकीट असे रुबाबदार व्यक्तिमत्व पाहता क्षणी समोरच्याला आपलेसे वाटलेच पाहिजे असे हास्य.
जळगावला १९३६ साली मॅट्रिक पास झालेले बापूराव उच्च शिक्षणाची सोय जळगावात नसल्याने पुढील शिक्षणासाठी मुंबईत गेले. मुंबईत शिक्षणासाठी गेलेले बापूराव यांनी कमवा आणि शिका या तत्त्वावर शिक्षण संपादन करून संघ कार्यास प्रारंभ केला. त्यामुळे दिवसभर संघ कार्यात व्यस्त असल्याने अभ्यास कधी होणार? असे वडिलांनी एकदा विचारले असता, बापूने सांगितले रात्री दहानंतर खोलीवर येऊन अभ्यास करीन. बी.कॉम फायनलची परीक्षा जवळ आलेली, कसे होणार? मग त्याचे प्राथमिक शाळेपासून सहाध्यायी असलेले असे बाळ भागवत आले मित्राच्या मदतीला, त्यांनी नोट्स काढून ठेवायच्या, बापूने त्या वाचायच्या आणि इतर अभ्यास करायचा. फक्त नोट्स वाचून पूर्ण झाल्या आणि परीक्षा येऊन ठेपली. परीक्षा झाली, बापूच्या बी.कॉम.च्या परीक्षेतील यशाबद्दल थोडी साशंकता असतानाच बापू बी.कॉम उत्तीर्ण झाल्याचे कळल्यावर आनंदाचा धक्काच बसला. पण त्याहीपेक्षा मोठा धक्का तो असा की, ज्या बाळ भागवतच्या नोट्स वापरून बापूने यश मिळवलं, त्या नोट्स बाळ भागवतला यश प्राप्ती देऊ शकल्या नाहीत. इथे बापूरावांची स्मरणशक्ती किती प्रभावी होती हेच दिसून येते. याच काळात त्यांनी एम.कॉम.चा लिहिलेला प्रबंध गुजरात सरकारने जप्त केलेला आहे. एकूण त्यांची पदव्युत्तर डिग्री सरकार दरबारी जमा आहे.
इंग्लंडच्या राणीच्या राज्याभिषेकाला इंग्लंडच्या निमंत्रणानुसार बापूंचा परदेश दौरा झाला. या त्यांच्या दौºयात बी.बी.सी.वरील मुलाखतीचे अधिकृत निमंत्रण होते. मुलाखतीच्या अगोदर एक प्रश्नावली देण्यात आली. प्रश्नावली पाहिल्यावर लक्षात आले की त्यातले काही प्रश्न हे अडचणीत टाकणारे आहेत, म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, काही प्रश्नांची उत्तरे मला देता येणार नाहीत. कारण त्या प्रश्नांची खरी उत्तरे दिल्यास ती इंग्लंडला अपमानकारक होतील व खोटी उत्तरे दिल्यास माझ्या राष्ट्राशी बेईमानी होईल. तेव्हा ते प्रश्न वगळले तर बरे होईल, असे नम्रपणे सांगितले. बापूंचे हे उत्तर बी.बी.सी.ला धक्कादायक वाटले, कारण प्रत्येक प्रश्नाला पैसे होते व पैशाकरिता हवी तशी उत्तरे देणारी माणसे आजपर्यंत त्यांना भेटली होती. अर्थात पैशाचा लोभ बापूरावांना अजिबात नसल्याने नम्रपणे पण तितक्यात बाणेदारपणे त्यांना हवी तशी उत्तरे देण्यास नकार दिला. त्यांच्या या स्वाभिमानी व राष्ट्रप्रेमी स्वभावाचे कौतुक बी. बी.सी.च्या अधिकाºयाने केले, ते असे ‘यु आर द फर्स्ट पर्सन टू से सो !’
असे हे बापूराव वयाच्या ८२ व्या वर्षी १० आॅगस्ट २००२ रोजी जळगाव मुक्कामी स्वर्गवासी झाले. यंदाचे वर्ष बापूरावांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९२० सालचा. त्यांच्या स्मृतीस त्यांची पुतणी म्हणून मी अभिवादन करते.
-संयोगिता गोगटे, नाशिक

Web Title: NABLE: A principled, charismatic personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.