खान्देशातील ६७ पैकी एकाच महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:26 PM2018-10-13T12:26:59+5:302018-10-13T12:27:53+5:30
कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची उदासीनता
सागर दुबे
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी ८२ तर कायम विनाअनुदानित ६७ पैकी फक्त एकाच महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे़ ३१ डिसेंबरपर्यंत ते करून घेण्याचे आदेश उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत.
दर पाच वर्षांनी नॅक कमिटी महाविद्यालयांचे मूल्यांकन करीत असते. यात महाविद्यालयांची रंगरंगोटी, भौतिक सुविधा आदी कामे महत्त्वाची ठरतात़ जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील काही महाविद्यालये नॅक मूल्यांकनाला सामोरे न जाता शासनाचे अनुदान लाटत आहेत़ सद्यस्थितीला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ८३ अनुदानित तर ६७ कायम विनाअनुदानित महाविद्यालये आहेत़ अनुदानित महाविद्यालयांपैकी ८२ महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेतलेले आहे़ तर दोंडाईचा येथील पी़बी़बागल महाविद्यालय अद्याप नॅक मूल्यांकनाला सामोरे गेलेले नाही, अशी माहिती उच्च शिक्षण सहसंचालकांनी दिली.
खान्देशातील ११ महाविद्यालयांना अ श्रेणी
नॅक मूल्यांकनानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अनुदानित ८२ महाविद्यालयांपैकी ११ महाविद्यालयांना अ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे़ ५९ महाविद्यालयांना ब श्रेणी तर १२ महाविद्यालयांना क श्रेणी मिळालेली आहे़ तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी फक्त शहादा येथील शहादा कॉ़ आॅप-सोसायटी महाविद्यालय हे नॅक मूल्यांकनाला सामोरे गेलेले आहे़
ज्या महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन नाही, ती महाविद्यालये रूसा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानास अपात्र ठरणार आहे तसेच त्या महाविद्यालयांवर कारवाई सुद्धा केली जाईल, म्हणून ३१ डिसेंबरच्या आत मूल्यांकन करून घ्यावे.
-केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण