सरपंचाची बिनविरोध निवड करून नगाव ठरले ‘प्रेरणादायी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 07:51 PM2017-09-22T19:51:31+5:302017-09-22T20:00:08+5:30
नगावच्या गावक:यांनी सरपंचाची बिनविरोध निवड करण्याबरोबरच ग्रामपंचायत सदस्यांचीही अविरोध निवड करून ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीचा प्रत्यय दिला आहे.
लोकमत ऑनलाईन अमळनेर : ‘गाव करील ते राव काय करील’ या अर्थाच्या म्हणीचे प्रत्यंतर तालुक्यातील नगाव खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आले आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्याचा घेतलेला निर्णय या गावाने प्रत्यक्षात अंमलात आणला असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ठरल्याप्रमाणे केवळ एकेक अर्ज दाखल करून बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. निवडीची आता केवळ औपचारिकता उरली आहे. 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला थेट निधी मिळत असल्याने अनेक गावांमध्ये लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी यंदा अनेकांनी फिल्डींग लावली असतांना मात्र येथील सरपंचपदी एका महिलेची निवड करून गावाने राज्याला ‘प्रेरणा’ देण्याचे कामही केले आहे. योगायोग म्हणजे बिनविरोध निवड झालेल्या सरपंच महिलेचे नाव देखील ‘प्रेरणा’च आहे. सरपंच म्हणून प्रेरणा सुशील बोरसे यांची निवड निश्चित झाली असून ग्रामपंचायत सदस्यपदीही गावगाडय़ातील सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यात आले आहे. एकीचे बळ अन्.. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह वापरास बंधन आल्याने विकासासाठी गावाची निवडणूक बिनविरोध घडवून आणण्यासाठी गावातील धुरिणांनी कंबर कसली. सर्व आजी- माजी सरपंच, ग्रा. पं. सदस्य , पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्यासह प्रतिष्ठित ग्रामस्थांनी सामूहिक बैठक घेतली. सर्वानुमते सरपंच म्हणून प्रेरणा सुशील बोरसे, उपसरपंच कोकीळाबाई गोसावी, सदस्य म्हणून तुषार नारायण बोरसे, संजय लोटन पाटील, प्रज्ञा ओंकार गोसावी, उज्वला संजय कुंभार, शालीक फुला मोरे, कमलबाई दत्तू सोनवणे आदींचेच फक्त उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी अशोक ठाकरे व सहाय्यक सुधाकर महाजन यांच्याकडे ठरल्याप्रमाणे सरपंच व प्रत्येक प्रभागात एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगाव खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे.