नालासोपारा प्रकरणी एटीएसने जळगाव जिल्ह्यातून पिता-पूत्रास घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:27 PM2018-10-25T13:27:38+5:302018-10-25T13:27:59+5:30
साकळीच्या संशयितांचे मोबाईल कनेक्शन?
जळगाव : नालासोपारा बॉम्ब प्रकरणात साकळी येथील तिघांना अटक झाल्यानंतर नाशिक एटीएसने बुधवारी चिनावल, ता.रावेर येथील शेख हमीद शेख इब्राहीम (वय ५२) व त्याचा मुलगा या दोन्ही बाप लेकास ताब्यात घेतले आहे. या दोघांचा नेमका काय संबंध याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
नालासोपारा येथील बॉम्ब प्रकरणात एटीएसने याआधी साकळी, ता.यावल येथून किरण निंबादास मराठे (वय ३०, रा.साकळी, ता.यावल) वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि विजय उर्फ भैय्या उखर्डू लोधी या तिघांना अटक केली होती. या तिघांचे मोबाईल कनेक्शन चिनावल येथील बापलेकांशी असल्याचा संशय आहे. त्यांनी वापरलेले मोबाईल सीम कार्ड या बापलेकांच्या नावावर असल्याची माहिती मिळाल्याचा संशय आहे.
दरम्यान, शेख हमीद यांचे कुंभारखेडा रस्त्यावर पठाणवाडीत घर आहे. बांधकामावर ते मजूर म्हणून काम करतात तर मुलगा केळीचा किरकोळ व्यवसाय करतो. या दोघांच्या नावावर असलेल्या मोबाईल सीम कार्डवरुन नालासोपारा, पंढरपूर, सोलापूर, सुरत व गुजरात मधून संपर्क झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या दोघांच्याबाबत स्थानिक यंत्रणेला मात्र कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते या दोघांना चौकशी करुन सोडून देण्यात आले तर काही जणांच्या मते त्यांना नाशिक येथे नेण्यात आल्याचे सांगितले जात होते.
जळगाव जिल्हा गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर साकळी, चिनावल या प्रकरणावरुन जळगाव जिल्हा गुप्तचर यंत्रणांच्या रडावर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. आॅगस्ट महिन्यात कोल्हापुर व कर्नाटक येथील एसआयटीच्या पथकाने गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणाशी संबधीत जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका घराची तपासणी केली होती. त्यानंतर नालसोपारा येथील बॉम्ब प्रकरणात साकळी येथील तिघांना अटक केली. आता चिनावल्या दोघांना ताब्यात घेतले.